मुंबई - मेक इन इंडियामुळे आयात होणाऱ्या वस्तूंना नवे पर्याय निर्माण झाले परंतु त्याचा निर्यातीसाठी फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे मेक इन इंडियाचा उद्देशच अयशस्वी आहे, असे मत सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे नवे अध्यक्ष व रसना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पिरुझ खंबाटा यांनी मंगळवारी व्यक्त केले.लॉजिस्टिक्स क्षेत्रातील समस्यांमुळे निर्यातीला हवे तसे प्रोत्साहन मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. वस्तूंच्या दळणवळणासाठी जलवाहतूक सर्वात किफायतशीर असते परंतु भारतात सर्वाधिक वाहतूक रस्त्याने होते. रस्त्याने हा माल बंदरांपर्यंत पोहोचवून तेथून तो बाहेर पाठविणे हे क्लिष्ट तसेच वेळकाढू असते. निर्यात न वाढण्यामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. यासाठी पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेली देशातील सर्व बंदरे आधी खासगी करायला हवीत. ट्रस्टला बंदरांचे व्यवस्थापन सांभाळताच येत नसल्याचे खंबाटा यांनी सांगितले. निर्यातकांना चीनच्या धर्तीवर ४ टक्के दराने वित्तसाह्य मिळायले हवे, असे मत खंबाटा यांनी व्यक्त केले.बँकांचे करा तातडीने खासगीकरणसध्याच्या संकटातून बाहेर येण्यासाठी देशातील सर्व बँकांचे तातडीने खासगीकरण व्हावे, असे मत खंबाटा यांनी मांडले. जगात जेथे-जेथे खासगीकरण झाले, तेथे दर्जात्मक रोजगार निर्मिती झाल्याचा दावा त्यांनी केला. सरकारी बँकांमध्ये होणारे घोटाळे टाळण्यासाठी बँकिंग प्रणालीत मोठ्या सुधारणांची गरज आहे, असे ते म्हणाले.
निर्यातीअभावी खोळंबले ‘मेक इन इंडिया’, सीआयआय प्रमुखांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:08 AM