नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर थोडे वाढले असले तरी स्थिर आहेत. तसे असताना भारतीय बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलची किंमत रोज वाढत आहे. हे इंधन स्वस्त करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपातीची मागणी तेल मंत्रालयाने केली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर मागील महिन्यापेक्षा जवळपास ८ डॉलर प्रति बॅरेलने अर्थात ३.२२ रुपये प्रति लीटरने वधारले आहेत. या कच्च्या तेलापासून २४ प्रकारची सामग्री तयार केली जाते. पेट्रोल व डिझेल ही त्यापैकीच एक. तसे असतानाही कच्चे तेल केवळ ३.२२ रुपये प्रति लीटरने वधारले असताना पेट्रोलची किंमत मात्र जवळपास साडेसहा रुपयांनी वाढली. मुंबईत मंगळवारी पेट्रोल ८०.२५ रुपये व डिझेल ६७.३0 रुपये प्रति लीटरवर पोहोचले. दुसरीकडे, कच्च्या तेलाचे दर डिसेंबरच्या तुलनेत वधारले असले तरी आठवडाभरापासून ते स्थिर आहेत, हे विशेष. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने नागरिकांचा तेल मंत्रालयावर रोष आहे.७२% उत्पादन शुल्क-पेट्रोल-डिझेलवर सध्या ७२ टक्के उत्पादन शुल्क आकारले. पेट्रोलच्या मूळ किमतीवर २२ रुपये तर डिझेलच्या मूळ किमतीवर १८ रुपये उत्पादन शुल्क असते. यामुळे उत्पादन शुल्कात कपात केली तर काही प्रमाणात तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त करा, शुल्क कपातीची तेल मंत्रालयाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:52 AM