नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) चार कोटींहून अधिक सदस्यांना आता पीएफ गहाण ठेवून स्वस्त घर योजनेत घर खरेदी करून ईपीएफ खात्यातून दरमहा गृहकर्जाचा हप्ताही चुकता करता येणार आहे. आगामी वित्तीय वर्षापासून ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे.कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांसाठी गृह योजनेवर आम्ही काम करीत आहोत. मार्चअखेर आॅनलाईन पीएफ काढण्याची सेवा सुरू करण्यात आल्यानंतर २०१७-१८ मध्ये गृहयोजना सुरू केली जाईल, असे ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधी आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले. या गृह योजनेमुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ गहाण ठेवून घर खरेदी करता येईल, तसेच ईपीएफ खात्यातून गृहकर्जाचा मासिक हप्ताही चुकता करता येईल, असे जॉय यांनी सांगितले. या योजनेहत ईपीएफओ मदतनीस म्हणून काम करणार आहे. जेणेकरून ईपीएफ सदस्यांना सेवाकाळात घर खरेदी करणे सोयीचे होईल. तथापि, जमीन खरेदी करण्याचा किं वा ईपीएफ सदस्यांसाठी घरे बांधण्याचा ईपीएफओचा बेत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.सेवाकाळात घर खरेदी न करू शकणाऱ्या अल्प उत्पन्नधारक आणि ईपीएफओचे सदस्य असलेल्या औपचारिक कामगारांसाठी ईपीएफओने नियुक्त केलेल्या समितीने या योजनेची शिफारस केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)>योजनेसाठी झाला त्रिपक्षीय करार....प्रस्तावित योजनेतहत बँक/गृहनिर्माण संस्था आणि ईपीएफओदरम्यान त्रिपक्षीय करार करण्यात येईल. जेणेकरून पीएफसाठीचे भविष्यातील योगदान मासिक हप्त्यासाठी गहाण ठेवले जाईल.ईपीएफओच्या सदस्यांना स्वस्त किमतीतील घरे खरेदी करता यावेत, यासाठी ईपीएफओने मदत करावी, असा प्रस्ताव मागच्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत होता. या बैठकीत विश्वस्त मंडळाच्या सदस्यांना या योजनेवरील तज्ज्ञ समितीचा अहवालही देण्यात आला होता. यासाठी ईपीएफओ सदस्यांना घर खरेदीसाठी जमा झालेल्या पीएफमधून आगाऊ उचल घेण्याचा, तसेच भविष्यातील पीएफमधील योगदान मासिक हप्त्यासाठी गहाण ठेवण्याची शिफारस या समितीने एकमताने केली होती.
पीएफ गहाण ठेवून करा घराचे स्वप्न पूर्ण
By admin | Published: October 03, 2016 6:22 AM