Join us  

अंगठा लावा आणि पेमेंट करा, डिजिटल पेमेंटला नवा 'आधार'

By admin | Published: December 27, 2016 11:58 AM

आधार पेमेंट अॅपमुळे फक्त आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपण कोणत्याही दुकान, हॉटेल किंवा अन्य ठिकाणी पेमेंट करु शकणार आहोत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - डिजिटल आणि कॅशलेस आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु असून नव्या योजना आणल्या जात आहेत. त्याचाचा भाग म्हणून आता सरकारकडून आधार पेमेंट अॅप सुरु करण्यात आलं आहे. या मोबाईल अॅपमुळे फक्त आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपण कोणत्याही दुकान, हॉटेल किंवा अन्य ठिकाणी पेमेंट करु शकणार आहोत. यासाठी फक्त आपल्याला अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे हे अॅप वापरण्यासाठी आपल्या खिशात स्मार्टफोन असण्याची गरज नाही. पण हे अॅप वापरण्यासाठी आपलं बँक खातं आधार कार्डशी संलग्न असलं पाहिजे. तसंच दुकानदार किंवा पेमेंट स्विकारणा-या व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक स्कॅनिंग मशीन असणं गरजेचं असणार आहे. पण फिंगरप्रिंट सेन्सर असणारा स्मार्टफोन असेल तर स्कॅनरचीदेखील गरज नाही. 
 
 
हे अॅप कसं काम करतं ?
आधार पेमेंट अॅपला युआयडी, आयडीएफसी आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयने तयार केलं आहे. हे अॅप दुकानदार आणि ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावं लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपला आधार क्रमांक आणि बँकेचं नाव टाकावं लागेल. यानंतर आपल्या अंगठ्याचा ठसाही त्यामध्ये द्यावा लागेल, त्यानंतर आपला अंगठ्याचा ठसा आपली ओळख असेल. आणि त्याद्वारे पेमेंट करु शकतो. 
 
कोणताही सर्व्हिस चार्ज नाही
आधार पेमेंट अॅपमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस चार्ज लागणार नाही. या डिजीटल पेमेंटकरिता कोणत्याही डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटची गरज नाही. तसंच हे अॅप वापरताना आपल्याला पिन क्रमांक देण्याचीही गरज पडणार नाही. यामुळे ग्राहक म्हणून आपला मोबाईल आपल्यासोबत नसला तरी आपलं काम सहजरित्या होऊ शकणार आहे. 
 
देशभरातील लगभग सर्व तरुणांकडे आधार कार्ड आहे. याशिवाय 40 कोटींहून जास्त लोकांचं आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे. यामुळेच या अॅपचा जास्तीत जास्त वापर होण्याची शक्यता आहे. हे अॅप सुरु झाल्यानंतर किमान 3 कोटी दुकानदार याचा वापर करतील असा अंदाज असून 25 ते 30 कोटी लोक याद्वारे खरेदी करण्याची शक्यता आहे.