Join us  

कॉर्पोरेट एफडी श्रीमंत करते?; गुंतवणूक फायद्याची ठरते की तोट्याची, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 9:02 AM

हाउसिंग फायनान्स कंपन्या अथवा अन्य एनबीएफसी कंपन्या कॉर्पोरेट एफडी इश्यू करतात.

अधिक परतावा मिळविण्यासाठी कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, नियमित एफडीच्या तुलनेत यात जोखीमही अधिक आहे. कॉर्पोरेट एफडीच्या माध्यमातून वित्त कंपन्या निधी उभा करतात. कॉर्पोरेट एफडीतील गुंतवणूक फायद्याची ठरते की तोट्याची ते पाहू...

अधिक व्याज कसे मिळते? 

हाउसिंग फायनान्स कंपन्या अथवा अन्य एनबीएफसी कंपन्या कॉर्पोरेट एफडी इश्यू करतात. यात नियमित एफडीच्या तुलनेत अधिक व्याज मिळते. मात्र, यातील ५ लाखांपर्यंतची गुंतवणूक डिपॉझिट इन्शुरन्स तथा क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशननुसार इन्शुअर्ड नसते. म्हणजेच कॉर्पोरेट एफडीला हा इन्शुरन्स मिळत नाही. कंपनी दिवाळखोरीत गेलीच तर पैसा बुडतो, ही एक मोठीच जोखीम या गुंतवणूक पर्यायात आहे. या जोखमीशिवाय इतर अनेक लाभ कॉर्पोरेट एफडीमधून मिळतात.

एफडी घेताना ‘हे’ लक्षात असू द्या!

  • गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा १०-२० वर्षांचा रेकॉर्ड पाहून घ्या.
  • एएए आणि एए क्रेडिट रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडीमध्येच गुंतवणूक करा. नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट एफडीमध्येच गुंतवणूक करा.
  • गुंतवणुकीपूर्वी कॉर्पोरेट एफडीचे व्याजदर व जोखीम पाहून घ्या.
  • अवास्तव व्याजाचे आमिष दाखविणाऱ्या कंपन्यांपासून दूरच राहा.

अधिक व्याज : कॉर्पोरेट एफडीमधून नियमित एफडीपेक्षा २ ते ३ टक्के अधिक व्याज मिळते. नियमित एफडीत ६ टक्के व्याज मिळत असताना कॉर्पोरेट एफडीमधून ९% व्याज मिळते.

सहज कर्ज सुविधा : बहुतांश कंपन्या कॉर्पोरेट एफडीवर परिपक्व रकमेच्या ७५%पर्यंत कर्ज देतात. मात्र, मुदतपूर्व निकासीवर दंड लागतो.

व्याजासाठी पर्याय : कॉर्पोरेट एफडीवर घेतलेल्या कर्जाचे व्याज भरण्यासाठी मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक असे पर्याय मिळतात. ही मोठी सोय यात आहे.

कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय? 

गृह वित्त कंपन्या व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. कॉर्पोरेट एफडी मुख्यत्वे बँक एफडीप्रमाणेच असते. या एफडीमध्ये बँक एफडीपेक्षा जास्त व्याज दर असतात. कॉर्पोरेट एफडी १२ महिने ते १२० महिन्यांसाठी असतात. कॉर्पोरेट एफडीवर काही कंपन्या ८.०९ टक्के व्याज देत आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के अधिक व्याजदरही मिळत आहे.

टॅग्स :व्यवसायभारतगुंतवणूक