भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून तणाव असताना भारताने मात्र शेजारी मित्र देशाची भूमिका चोख बजावली आहे. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात मालदीवसाठी गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट निधी दिला आहे. वाचून आश्चर्य वाटले ना, हो भारत सरकारने यंदाच्या बजेटमध्ये मालदीवसाठी 770.90 कोटी रुपये राखून ठेवले आहेत.
मालदीव आता चीनच्या वाटेवर निघाला आहे. नवे राष्ट्रपती मोईज्जू हे भारतविरोधी असून चीनधार्जिणे आहेत. यामुळे भारतीय सैन्याला मालदीवमधून जाण्यासही मोईज्जू यांनी सांगितले आहे. अशातच मोदी लक्षद्वीपच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर तेथील समुद्रकिनाऱ्यावरील विश्रांतीचे फोटो पोस्ट केले होते. यावरून मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतावर आक्षेपार्ह टीका केली होती. यामुळे संतापलेल्या भारतीयांनी मालदीवला वाळीत टाकत तेथील टूर प्लॅन रद्द केले होते.
मालदीवचा प्रमुख जरी बदलला असला तरी आजही तेथील जनता भारताच्या उपकारांवर जगत आहे. मालदीवला भारत कित्येक वर्षे मदत करत आला आहे. तिथे अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट भारताच्या मदतीने बनत आहेत. अशावेळी भारताने सुरुवातीला मालदीवसाठी ४०० कोटी रुपये बजेटमध्ये दिले होते. ते आता दुप्पट करण्यात आले आहेत.
मालदीवसोबतच भारताने अन्य छोट्या मित्र देशांना देखील यंदाच्या बजेटमध्ये पैसे राखून ठेवले असून यामध्ये भुतान पहिल्या क्रमांकावर आहे. भुतानसाठी 2398.97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 1614.36 कोटी रुपये कर्जाची रक्कमही आहे. याचबरोबर नेपाळसाठी ६५० कोटी, म्यानमारसाठी ३७० कोटी आणि मॉरिशससाठी ३३० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.