बंगळुरु : आता अवसायानात गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या नावे घेतलली बँकांची कर्जे बुडवून देशातून पसार झालेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याचे खासगी वापरासाठीचे जेट विमान अखेर येथील लिलावात ३४.८ कोटी रुपयांना (५.०५ दशलक्ष अमेरिकी डॉलर) विकले गेले.
किंगफिशर एअरलाइन्सकडील सेवा कराच्या थकबाकीच्या वसुलीसाठी या विमानाचा लिलाव पुकारण्यात आला. याआधी दोन वेळा पुकारलेल्या लिलावात कोणीही बोली लावली नव्हती. आता या तिसऱ्या लिलावात १.९ दशलक्ष डॉलरपासून बोली सुरू झाली आणि अमेरिकेतील अॅव्हिएशन मॅनेजमेंट सेल्स या भागीदारी संस्थेची ५.०५ दशलक्ष डॉलरची सर्वोच्च बोली मंजूर झाली. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यावर हा विक्रीव्यवहार पक्का होईल.
‘एअरबस ए-३१९’ प्रकारच्या या विमानात २५ प्रवासी व सहा कर्मचारी प्रवास करू शकतात. या विमानामध्ये एक शयनकक्ष, स्वच्छतागृह, बार व कॉन्फरन्ससाठी जागा याखेरीज अन्य ऐशारामाच्या सोयी आहेत. सेवाकर विभागाने सप्टेंबर २०१३ मध्ये हे विमान जप्त करून ते मुंबई विमानतळावर उभे करून ठेवले होते, परंतु आधीच जागेची टंचाई असल्याने या विमानामुळे एरवी मिळणाºया जागेच्या भाड्याचे नुकसान होत होते, असे कारण देऊन विमानतळ कंपनीने विमान तेथून हलविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने विमानाचा लिलाव पुकारण्याचा आदेश दिला होता. किंगफिशर कंपनीचे मुख्यालय बंगळुरूमध्ये असल्याने लिलाव येथे केला गेला. (वृत्तसंस्था)
खूपच स्वस्तात सौदा
माहीतगारांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे आलिशान सोयींचे विमान नवे घेतल्यास त्याची किंमत १०० दशलक्ष डॉलर मोजावी लागेल. त्यामुळे खरेदीदाराचा लिलावातील सौदा खूपच स्वस्तात झाला. गेली पाच वर्षे विमान जमिनीवरच असल्याने सध्या ते उड्डाणक्षम (एअरवर्दी) नाही, परंतु थोड्या-फार खर्चात ते पुन्हा भरारी घेऊ शकेल.
मल्ल्याचे विमान विकले ३५ कोटींना, बंगळुरूमध्ये लिलाव; न्यायालयाचे शिक्कामोर्तब आवश्यक
आता अवसायानात गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या नावे घेतलली बँकांची कर्जे बुडवून देशातून पसार झालेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याचे खासगी वापरासाठीचे जेट विमान अखेर येथील लिलावात ३४.८ कोटी रुपयांना (५.०५ दशलक्ष अमेरिकी डॉलर) विकले गेले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:57 PM2018-06-30T23:57:20+5:302018-07-01T00:00:00+5:30