मुंबई : विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची प्रत्यक्ष कारवाई अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये मल्ल्या याच्या युनायटेड ब्रुवरिज लिमिटेड (यूबीएल) कंपनीची मालकी आणि १०० कोटी रुपये मूल्याचे समभाग ‘स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड’ने (एसएचसीआयएल) केंद्र सरकारकडे हस्तांतरित केले आहेत.हस्तांतरित झालेले समभाग विजय मल्ल्याच्या थेट मालकीचे होते. ते कुठेही तारण नव्हते. मनी लाँड्रिंग कायद्याच्या कलम ९ अन्वयेते जप्त करण्याच्या सूचना देणारे पत्र ईडीने दोन महिन्यांपूर्वी एसएचसीआयएल कंपनीला पाठविले होते. याशिवाय मॅक्डॉवेल होल्डिंग या कंपनीतील सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे समभागही अशाच पद्धतीने जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये ईडीने हे समभाग जप्त केले होते. आता ते सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीकडे विविध बँकांचे ६ हजार कोटी थकले आहेत. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.>हेतुत: थकविलेल्या कर्जाचा आकडा १ लाख कोटींवरहेतुत: थकविण्यात आलेल्या कर्जांचा आकडा आता १ लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाला आहे. ‘ट्रान्सयुनियन सिबील’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी बँकांची सहेतुक थकबाकी ४५ टक्क्यांनी म्हणजेच ३४,९०० कोटी रुपयांनी वाढली. मार्च २०१६ मध्ये सहेतुक थकबाकीचा आकडा ७४,६९४ कोटी रुपये होता. मार्च २०१७ मध्ये तो १,०९,५९४ कोटी रुपये झाला.सहेतुक थकबाकीच्या बाबतीत स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) सर्वोच्च स्थानी आहे. बँकेच्या ९९७ खातेदारांनी १५,०६९ कोटी रुपयांचे कर्ज हेतुत: थकविले आहे. २०१७ मध्ये बँकेची सहेतुक थकबाकी २,७५९ कोटींनी वाढली.
मल्ल्याच्या संपत्तीची जप्ती सुरू, ईडीने यूबीएल कंपनीची मालकी, १०० कोटीचे समभाग केले हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:17 AM