मामाअर्थ (Mamaearth), द डर्मा (The Darma) आणि बीब्लंट (BBlunt) सारख्या सुप्रसिद्ध ब्रँडची मूळ कंपनी होसाना कन्झ्युमरच्या (Honasa Consumer) शेअर्सनं आज शेअर बाजारात एन्ट्री घेतली. कंपनीच्या IPO ला पहिल्या दोन दिवसात फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशीच आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झाला. एकूण आयपीओ सात पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. आयपीओ अंतर्गत 324 रुपये किमतीला शेअर्स जारी करण्यात आले आहेत.आज बीएसईवर त्याची 324 रुपयांच्या किमतीत एन्ट्री झाली. याचा अर्थ IPO गुंतवणूकदारांना कोणताही लिस्टिंग लाभ (Mamaearth Listing Gain) मिळाला नाही. लिस्टिंग नंतर कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ दिसून आली. कामकाजादरम्यान तो 326.85 (Mamaearth Share Price) रुपयांवर व्यवहार करत होता. म्हणजे आयपीओतील गुंतवणूकदारांना केवळ 0.88 टक्के नफा झाला. कर्मचाऱ्यांना मात्र अधिक फायदा झाला. कारण त्यांना प्रत्येक शेअर 30 रुपयांच्या सवलतीत मिळाला आहे.संमिश्र प्रतिसादहोनासा कन्झ्युमरचा 1701 कोटी रुपयांचा आयपीओ 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि तो शेवटच्या दिवशी तो पूर्णपणे सबस्क्राईब झाला.या इश्यू अंतर्गत, 365 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत आणि 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या 41,248,162 शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) विंडो अंतर्गत विक्री करण्यात आली. या आयपीओद्वारे वरुण अलघ आणि गझल अलघ, सोफिना व्हेंचर्स एसए, इव्हॉल्व्हन्स, फायरसाइड व्हेंचर्स, स्टेलारिस व्हेंचर पार्टनर्स, स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल, बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, ऋषभ हर्ष मारीवाला आणि रोहित कुमार बन्सल यांनी त्यांची भागीदारी कमी केली आहे आणि ऑफर फॉर सेलचे पैसे त्यांना मिळणार आहेत.
Mamaearth IPO Listing: फ्लॅट लिस्टिंगनं गुंतवणूकदार नाराज, IPO ला मिळालेला संमिश्र प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 10:41 AM