मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अखेर मंगळवारी अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली.
केंद्र - राज्य सरकार व सिडकोची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी समूहाकडे हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
‘जागतिक किर्तीच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन हाती घेताना आम्हाला अत्यानंद होत आहे. मुंबईकरांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी भविष्यात आम्ही करून दाखवू. प्रवाशांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच पर्यावरणाचे भान राखून कामकाज केले जाईल. स्थानिकांसाठी मोठ्या रोजगार संधी निर्माण केल्या जातील,’ अशा आशयाचे ट्विट अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीत जीव्हीके समुहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका’ यांची भागीदारी १० टक्के होती. फेब्रुवारी २०२१मध्ये अदानी समुहाने २३.५० टक्के हिस्सा १ हजार ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला. आता जीव्हीके समुहाकडील ५०.५० टक्के हिस्सा ताब्यात आल्याने अदानी समूह एकूण ७४ टक्क्यांचा भागीदार होईल. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे.
गेल्या वर्षी तीन ठिकाणचे व्यवस्थापन मिळाले
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडची स्थापना २ मार्च २००६ रोजी झाली होती. ही कंपनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, निर्मिती आणि परिचालनाचे काम करते. अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही अदानी एन्टरप्राईजेसची उपकंपनी त्यांच्या अखत्यारीतील विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. गेल्या वर्षी मंगळुरू, लखनऊ आणि अहमदाबाद विमानतळाचे व्यवस्थापन अदानी समुहाच्या ताब्यात आले होते.