मुंबई - देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टेकओव्हरची प्रक्रिया पूर्ण केली आहे. स्वत: गौतम अदानी यांनी आज ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. अदानी समूह एव्हिएशन सेक्टरमध्ये आपली पकड मजबूत करत आहे. तसेच मुंबई विमानतळाचे टेकओव्हर हे या प्रक्रियेमधील एक मोठे पाऊल आहे.
दरम्यान, टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर गौतम अदानी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही मुंबईला गौरवान्वित वाटावे असे काम करू, हे आमचे वचन आहे. अदानी समूह व्यवसाय. लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल. आम्ही हजारो स्थानिक लोकांना नवा रोजगार देऊ.
We are delighted to take over management of the world class Mumbai International Airport. We promise to make Mumbai proud. The Adani Group will build an airport ecosystem of the future for business, leisure and entertainment. We will create thousands of new local jobs.
— Gautam Adani (@gautam_adani) July 13, 2021
देशातील प्रमुख विमानतळांचे व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्यासाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये निविदा मागवल्या होत्या. यामध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममधील विमानतळांच्या व्यवस्थापनाचा ठेका अदानी समुहाला मिळाला होता. अदानी समुहाकडे या विमानतळांचे व्यवस्थापन पाहण्याचा ५० वर्षांचा ठेका आहे. एअरपोर्ट व्यवस्थापन सेक्टरमध्ये जीएमआरसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याची मक्तेदारी मोडीत काढत अदानी समुहाने हा ठेका मिळवला होता.