चंद्रकांत दडस, उपसंपादक
घरामध्ये महिलांनी एकदा निर्णय घेतला की तो अगदी पक्का असतो. कारण महिला एखाद्या विषयाचा करत असलेला सखोल अभ्यास. गुंतवणूक करतानाही महिला अशाच ठोस निर्णय घेऊन कुटुंबाची आर्थिक भरभराट करतात. त्या गुंतवणुकीमध्ये सुरक्षा, स्थिरतेची काळजी घेतात. त्यामुळेच महिलांच्या हाती घराचा कारभार देणे अतिशय फायदेशीर ठरते.
कोरोनाने शिकवले निर्णय घ्यायला
एका अहवालात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीनंतर गुंतवणुकीचे निर्णय घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. ४४% महिलांनी गुंतवणुकीबाबत स्वतःचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
कोण कुठे करतात गुंतवणूक?
सर्वेक्षणात महिला आणि पुरुष दोघांच्याही गुंतवणुकीच्या पद्धतींवर लक्ष देण्यात आले. गुंतवणूक करण्यापूर्वी महिला सुरक्षा, स्थिरता, शिस्त या मुद्यांकडे लक्ष देतात. त्या मुदत ठेवी, पोस्ट ऑफिसमधील बचत, रोखे किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, तर पुरुषांमध्ये याच्या उलट प्रवृत्ती दिसून येते. पुरुषांना गुंतवणुकीत जास्त रिस्क घ्यायला आवडते. यासाठी ते शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात.
गुंतवणुकीमागील उद्दिष्टे काय?
उत्तम जीवनशैली, तणावमुक्त सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, प्रवास, कर्जमुक्त जीवन, घर खरेदी, व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने लोक गुंतवणूक करतात. स्त्रिया मुलांच्या शिक्षणासाठी अधिक गुंतवणूक करतात. त्यांना गुंतवणुकीतून नवीन घर खरेदी करण्याची इच्छा असते. तर पुरुषांना जास्त परतावा आणि कर्जापासून मुक्तता हवी असते.
महिला अवलंबतात या पद्धती...
संशोधनानंतर गुंतवणूक : महिला गुंतवणूक करण्यापूर्वी खूप संशोधन करतात. केवळ ऐकून गुंतवणूक करत नाहीत. शंका असल्यास, सल्ला घेण्यास घाबरत नाहीत.
कमी रिस्क घेतात : स्त्रिया धोकादायक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक टाळतात. केवळ १५% महिलांनी क्रिप्टोत गुंतवणूक केली आहे.
उद्दिष्ट स्पष्ट असते : महिलांचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. वारंवार बदलत नाही. म्हणूनच त्या भरकटत नाहीत.
धीर धरतात : बाजारातील चढ-उतारांमुळे बहुतेक गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात. महिला असे क्वचितच करतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"