नवी दिल्ली : या महिन्याअखेरपर्यंत पॅन कार्डचीआधार कार्डशी जोडणी (लिंक) करणे सक्तीचे आहे, याची आठवण प्राप्तिकर विभागाने रविवारी (दि.15) एका जाहीर निवेदनाद्वारे करदात्यांना करून दिली आहे. 31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्डचीआधार कार्डसोबत जोडणी केली नाही तर प्राप्तिकराचे रिटर्न भरता येणार नाहीत.
उत्तम भविष्य काळाची पायाभरणी करा! 31 डिसेंबरपर्यंत पॅन व आधारची जोडणी करून प्राप्तिकर विभागाच्या सेवा विनासायास मिळवा, असे प्राप्तिकर विभागाने या निवेदनात म्हटले आहे. याआधी पॅन व आधारची जोडणी करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, प्रत्यक्ष कर मंडळाने नंतर ती 31 डिसेंबरपर्यंत वाढविली होती. ही मुदत संपण्याच्या आधी प्राप्तिकर विभागाने या मुदतीची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. त्यामुळे आपले कोणत्याही कारणास्तव पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडणे शक्य झाले नसेल तर येत्या 15 दिवसांपर्यंत जोडता येणार आहे.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाने पॅनशी आधार जोडणे बंधनकारक केले आहे. तसेच 31 डिसेंबरपर्यंत न जोडल्यास आपले पॅनकार्ड 1 जानेवारी 2020 पासून निष्क्रिय करण्यात येणार आहे. पॅन आणि आधार क्रमांक प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरुन किंवा एसएमएसच्या सहाय्याने जोडता करता येणार आहे. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव आणि जन्मतारीख चुकीची असणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.