Join us

मंगता है क्या, कुछ तो बोलो; कार, बाइक आणि स्मार्टफोनच्या जोरदार विक्रीमुळे बाजारात उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 7:16 AM

यंदाही या वस्तूंना जोरदार मागणी आहे.

नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात नवे घर, कार, बाइक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोन तसेच सोन्याचे दागिने खरेदीचे बेत आखले जातात. यंदाही या वस्तूंना जोरदार मागणी आहे. प्रचंड मागणी वाढल्याने बड्या कंपन्यांनी कारचे दर वाढवून डिस्काउंट ऑफर्सही कमी केल्या आहेत, तरीही खरेदीचा उत्साह कायम आहे.

ऑटोमोबाइल कंपन्यांचा अंदाज आहे की, सणासुदीच्या या हंगामात १० लाखांहून अधिक गाड्यांची विक्री होईल. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कारचे बुकिंग केले जाते. त्या दिवशी लोक किमतीचा विचार न करता बिनधास्त खर्च करतात.

बाजारात सध्या सकारात्मक चित्र दिसत असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या खनिज तेलाच्या दरांमुळे चिंतेचे ढग कायम आहेत. तेल महागल्याने वस्तूंच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

खरेदी वाढण्यामागची प्रमुख कारणे

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये घाऊक महागाई दरात घट झाली आहे. सप्टेंबरप्रमाणेच ऑक्टोबर, नोव्हेंबरध्ये यात घट होईल, अपेक्षा आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये पावसाने चिंता वाढविली होती; परंतु पावसाने सप्टेंबरमध्ये तूट भरून काढल्याने शेतकरी सुखावला आहे. यामुळे ग्रामीण भागातही मागणी वाढली आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याने काही कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे दर कमी केले आहेत. या स्वस्ताईमुळे काही उत्पादनांच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

सणासुदीत ग्राहकांमध्ये खरेदीला चांगला जोर

५% इतकी वाढ सप्टेंबरच्या तिमाहीत कारच्या विक्रीमध्ये झाली आहे. जूनच्या तिमाहीच्या या महिन्यात ८ टक्के अधिक वाहने विकली गेली.

३% इतकी वाढ जुलै ते सप्टेंबर या कालावधीत स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये नोंदविली गेली आहे. जानेवारी २०२३ पासून यात सातत्याने घट होत होती.

६.२% इतकी वाढ घरामध्ये लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये हंगाम सुरू होण्याआधीच झाली आहे. सणासुदीत ही विक्री २० टक्क्यांनी वाढू शकते.

८-१२% इतकी वाढ सप्टेंबरमध्ये मागील वर्षातील याच कालखंडाच्या तुलनेत ग्राहकांना लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या विक्रीमध्ये झालेली दिसून येते.