Join us  

Mankind Pharma Success Story: MR म्हणून बसमध्ये औषधे विकली, पहिली बुडाली; हार न मानता उभारली ४३००० कोटींची कंडोम कंपनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 4:57 PM

Mankind Pharma Success Story: कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा कंपनीचा प्रवास जेवढा खडतर आहे, तेवढाच तो रंजक आणि प्रेरणादायी आहे.

Mankind Pharma Success Story: शेअर मार्केटमध्ये एकामागून एक आयपीओ येण्याचा ओघ सुरूच आहे. शेअर मार्केटमध्ये चढ-उतार येत असले तरी कंपन्या IPO सादर करताना दिसतात. अशातच फार्मा क्षेत्रातील एका दिग्गज कंपनीने आयपीओ सादर केला असून, या कंपनीचा प्रवास रंजक तितकाच प्रेरणादायी आहे. कंपनीची सुरुवात करणारे रमेश जुनेजा यांना हे यश एका दिवसांत मिळालेले नाही. त्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागल्या. आपल्या करिअरची सुरुवात साध्या वैद्यकीय प्रतिनिधीपासून सुरू करणाऱ्या रमेश जुनेजा यांनी कष्ट आणि कल्पक तसेच आधुनिक विचारांमुळे ४३ हजार कोटींची मॅनकाइंड फार्मा कंपनी मजबुतीने उभी केली. 

मेरठचे रहिवासी असलेले रमेश जुनेजा यांनी १९७४ मध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली. कंपनीची औषधे विकण्यासाठी दररोज यूपी रोडवेजच्या बसने प्रवास करायला लागायचा. या प्रवासादरम्यान ते लोकांना कंपनीच्या औषधांबद्दल माहिती द्यायचे. तर त्या भागातील डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांना अनेक तास थांबावे लागले. १९७५ मध्ये ते ल्युपिन फार्मा मध्ये रुजू झाले, जिथे त्यांनी ८ वर्षे काम केल्यानंतर १९८३ मध्ये कंपनी पदाचा राजीनामा दिला. 

लोकांना परवडतील अशी औषधे बनवण्याचा निर्णय

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रमेश जुनेजा केमिस्टच्या दुकानात उभे होते. तेव्हा एक माणूस दुकानात आला. त्याला औषध हवी होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. औषधांचे पैसे भरण्यासाठी त्याने चांदीचे दागिने सोबत आणले होते. औषधाच्या बदल्यात दागिने देण्याचे त्यांनी सांगितले. रमेश जुनेजा यांच्यावर या घटनेचा मोठा प्रभाव पडला. त्याचवेळी अशी औषधे बनवणार, जी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या बजेटमध्ये राहतील. औषध घेण्यासाठी कोणालाही दागिने विकावे लागणार नाही. कमी किमतीच्या आणि उत्तम दर्जाच्या कल्पनेतून रमेश जुनेजा यांना स्वतःची फार्मा कंपनी उघडण्याची कल्पना सुचली.

...आणि झाली मॅनकाइंड फार्माची उभारणी

रमेश जुनेजा यांनी मित्रासोबत बेस्टोकेम नावाची फार्मा कंपनी उघडली, मात्र त्यांना यश मिळाले नाही. यानंतर रमेश जुनेजा यांनी भावासोबत मॅनकाइंड फार्मा सुरू केली. सुरुवातीला कटू अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. १९९५ मध्ये भावाला सोबत घेतले आणि दोन्ही भावांनी ५० लाख रुपये कंपनीत गुंतवले. कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी २५ वैद्यकीय प्रतिनिधींना त्यांच्यासोबत जोडले. यानंतर पहिल्याच वर्षी कंपनीचे मूल्यांकन ४ कोटी रुपयांवर पोहोचले. 

कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादने बनवण्यात आघाडीवर

कंडोम आणि गर्भनिरोधक प्रोडक्ट बेडरूममधून थेट वृत्तपत्र, टीव्हीपर्यंत पोहोचवले. त्यांनी जाहिरातींना टार्गेट केले. रमेश आणि त्यांच्या भावाची रणनीती यशस्वी ठरली. आज मॅनकाइंड फार्मा कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादने बनवण्यात आघाडीवर असून त्यांनी आपल्या व्यवसायाच्या धोरणात सतत नवीन गोष्टींचा समावेश केला. २००७ मध्ये मॅनकाइंडने कंडोमची जाहिरात टीव्हीवर आणली आणि ती प्रचंड लोकप्रिय ठरली. याचा मोठा प्रभाव लोकांच्या मानसिकतेवर पाहायला मिळाला आहे. कंपनी कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादनांव्यतिरिक्त मधुमेह, उच्च रक्तदाब औषधे बनवते. या घडीला मॅनकाइंड फार्मा ही कंपनी ४३,२६४ कोटींची झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार