चंद्रकांत दडस
देशात वस्तूंच्या किमती वाढत गेल्याने चलनाची किंमतही वाढली आहे. त्यामुळे कमी किमतीच्या चलनाला अर्थात पैशाला किंमत राहिलेली नाही. रिझर्व्ह बँककडून अधिकृत असलेले ५० पैशांचे चलन केवळ नावापुरतेच उरले असून, त्याचा वापर करणे ग्राहकांनी बंद केले आहे. असे असले तरी देशात ५० पैशांची तब्बल १,४७,८८० लाख नाणी पडून असून त्याची एकूण किंमत ७०० कोटी रुपये असल्याचे आरबीआयच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
२५ पैशांची नाणी ३० जून २०११ पासून चलनातून बाद करण्यात आली असून ती आता कायदेशीर चलन राहिलेली नाहीत. २५ पैशांपेक्षा कमी मूल्याच्या नाण्यांचा वापर यापूर्वीच थांबवण्यात आला होता.
५० पैशांचे काय होणार ?
५० पैसे वैध असले तरी त्याचा रोख व्यवहार शून्यावर आला आहे. व्यापारी आणि ग्राहकही ही नाणी स्वीकारत नाहीत. डिजिटल पेमेंट आणि यूपीआय व्यवहारांमुळे नाण्यांची किंमत आणखी कमी झाली आहे. आरबीआयने ही नाणी परत घेतल्यास तब्बल ७०० कोटींची रक्कम परत बँकिंग प्रणालीत परत येऊ शकते.
कोणत्या नाण्याला किंमत जास्त?
सध्या चलनात १ रुपयाचे कॉइन बाजारात सर्वाधिक आहेत. यानंतर २ रुपयाचे कॉइन बाजारात आहेत. असे असले बाजारात ५ रुपयांच्या नाण्याची किंमत सर्वाधिक आहे. १०,७५३ कोटी रुपये किमतीची २,१५,०५८ नाणी बाजारात चलनात आहेत.
चलनातून बाद केलेल्या २ हजार रुपयांच्या ०.३३ कोटी नोटा बाजारात असून त्याचे मूल्य ६,४७१ कोटी रुपये आहे. त्यामुळे या नोटा आरबीआय पुन्हा कशा मिळवणार हा प्रश्नच आहे.