रिलायन्स ग्रुपचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचे बंधू आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचा आज जन्मदिन आहे. ४ जून १९५९ रोजी जन्मलेले अनिल अंबानी ६४ वर्षांचे झाले आहेत. एकेकाळी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. मात्र आता त्यांचा उद्योग व्यवसाय डबघाईला आलेला आहे. त्यांची एक कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीची दुसऱ्या टप्प्यातील बोली पूर्ण झाली आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी हिंदुजा ग्रुपने ९ हजार ६५० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. हिंदुजा समुहाची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंगने या कंपनीला खरेदी करण्यासाठी अंतिम रोख प्रस्ताव दिला आहे. एकेकाळी प्रचंड संपत्ती बाळगणाऱ्या अनिल अंबानींकडे आता किती कारभार उरला आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
रिलायन्स ग्रुपची स्थापना धीरूभाई अंबानी यांनी १९५८ मध्ये केली होती. आज ही कंपनी जगभरात व्यवसाय करत आहे. २००२ मध्ये धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्सच्या व्यवसायांची वाटणी झाली होती. मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात ही वाटणी झाली होती. मुकेश अंबानी यांच्याकडे पेट्रोकेमिकल, टेक्सटाइल, रिफायनरी, तेल, गॅस हे व्यवसाय आले. तर अनिल अंबानी यांच्याकडे टेलिकॉम, फायनान्स, उर्जा हे व्यवसाय आले.
अनिल अंबानी यांच्याकडील टेलिकॉम, पॉवर या व्यवसायांना नव्या जमान्यातील यशाची हमी मानले जात होते. या क्षेत्रात ते मोठे खेळाडू बनू इच्छित होते. त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या होत्या. मात्र विविध कारणांमुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले होते. सुरुवातीच्या काळात अनिल अंबानी यांच्या कंपन्या जोरदार नफा कमवत होत्या. त्यामुळेच २००८ मध्ये अनिक अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचले होते. मात्र नंतर वाढतं कर्ज आणि घटतं उत्पन्न यामुळे त्यांची घसरण झाली.
सध्या अनिल अंबानींकडे रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स नेव्हल अँड डिफेन्स लिमिटेड, रिलायन्स, रिलायन्स हौसिंग फायनान्स या कंपन्या आहेत.