Join us

अनेक कंपन्या बंद करणार वर्क फ्रॉम होम; कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसात बोलावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 7:06 AM

हायब्रिड वर्किंगमध्ये कर्मचाऱ्यांना कामाच्या बाबतीत अधिक लवचीकपणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

वॉशिंग्टन : कोविड-१९ साथीची तिसरी लाट ओसरल्यानंतर जगातील बड्या आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसात बोलावण्याची तयारी करीत आहेत. मायक्रोसॉफ्टने २८ फेब्रुवारीपासून हायब्रीड वर्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांचा वेळ देणार आहे. वातावरण चांगले राहिले तर टप्प्याटप्प्याने ‘वर्क फ्रॉम होम’ संपविण्याची योजना कंपन्यांकडून आखली जात आहे.

माइक्रोसॉफ्टचे चीफ मार्केटिंग ऑफिसर क्रिस कॅपोसेला यांनी सांगितले की, कंपनी २८ फेब्रुवारीपासून हायब्रीड वर्किंगमध्ये परिवर्तित होत आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यात येईल. हायब्रिड वर्किंगमध्ये कर्मचाऱ्यांना कामाच्या बाबतीत अधिक लवचीकपणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. केव्हा आणि कोठून काम करायचे, हे निवडण्याची संधी कर्मचाऱ्यांना दिली जाईल. ज्यांना अजूनही वर्क फ्रॉम होम हवे आहे, त्यांना आता परवानगी घ्यावी लागेल. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या-जाण्यासाठी बस आणि कॅब शेअरिंग सुविधा सुरू करण्यात येईल. कोरोना महामारीमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ दिले होते. यामुळे अनेकांच्या प्रवासासह इतर खर्चात मोठी बचत होत होती. 

दुसऱ्या लाटेचा बसला फटकासूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीच्या पहिल्या लाटेनंतरच मायक्रोसॉफ्टसह अनेक बड्या आयटी कंपन्या आपली कार्यालये कर्मचाऱ्यांसाठी खुली करू इच्छित होत्या. तथापि, नंतर लगेचच दुसरी लाट आली. त्यामुळे कंपन्यांची ही योजना बारगळली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या