Tata Group IPOs: दोन दशकांनंतर अलीकडेच टाटा समूहाचा आयपीओ आला. टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) हा आयपीओ होता. यानंतर आता टाटा समूह पुढील दोन ते तीन वर्षांत आणखी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा कॅपिटल, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी, बिगबास्केट, टाटा डिजिटल, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, टाटा हाउसिंग आणि टाटा बॅटरीजचे आयपीओ येत्या काही दिवसांत लॉन्च केले जाऊ शकतात. समूहाला डिजिटल, रिटेल, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करायचा आहे.
काय आहे प्लॅन?
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टाटा सन्सच्या होल्डिंग कंपनीच्या या धोरणात्मक हालचालीचं उद्दिष्ट व्हॅल्यू अनलॉक करणं, भविष्यातील वाढीला चालना देणं आणि निवडक गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचे पर्याय उपलब्ध करून देणं हे आहे. शेअर बाजारात उतरण्याचा निर्णय कायमच रणनीतीक असतो आणि यासाठी आयपीओ आणण्यात कोणतीही घाई करण्याची योजना नसल्याचं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
नोव्हेंबर महिन्यात आलेला टाटा टेकचा आयपीओ
टाटा समूहाचा अखेरचा IPO टाटा टेक्नॉलॉजीजचा होता, जो नोव्हेंबर २०२३ मध्ये लॉन्च झाला होता. यापूर्वी २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) आयपीओ आला होता. टाटा समूह २०२७ पर्यंत नवीन उद्योगांमध्ये ९० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. यामध्ये मोबाइल कम्पोनंट्स, इलेक्ट्रिक वाहनं, बॅटरी, रिन्युएबल एनर्जी आणि ई-कॉमर्सचा समावेश आहे.