कोलकाता : वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) नियमांची पूर्तता करताना दूरसंचार कंपन्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक श्रेणीतील पोस्टपेड आणि कॉर्पोरेट व व्यावसायिक ग्राहकांना मोबाइलची मासिक बिले पाठविण्यास विलंब होत आहे.भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांना टेक्स्ट मेसेज पाठविला आहे. तांत्रिक अडचणीमुळे या महिन्याचे बिल पाठविण्यास किमान एक आठवडा उशीर होईल, असे त्यात म्हटले आहे. दिल्ली आणि कोलकाता येथील पोस्टपेड ग्राहकांनी सांगितले की, जीएसटीशी संबंधित अडचणींमुळे बिले पाठविण्यास उशीर होत असल्याचे आम्हाला एअरटेलच्या ग्राहक सुविधा केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. दुसºया क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोनला आपल्या कॉर्पोरेट आणि व्यावसायिक ग्राहकांना मासिक बिले पाठविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ग्राहकांनी जीएसटी नोंदणी क्रमांक कंपनीला कळविला नसल्यामुळे कंपनी त्यांना बिले पाठवू शकत नाही. जीएसटीच्या नियमानुसार कॉर्र्पोरेट आणि व्यावसायिक ग्राहकांच्या मासिक दूरसंचार बिलात ग्राहकांचा जीएसटी नोंदणी क्रमांक नोंदविणे बंधनकारक आहे.दूरसंचार क्षेत्रातील एका अधिकाºयाने सांगितले की, १ जुलैनंतरच्या आपल्या सर्व बिलांत जीएसटीच्या रकमेचा स्वतंत्रपणे उल्लेख कंपन्यांना करावा लागणार आहे. त्यासाठी कंपन्यांना आपल्या आयटी तथा बिलिंग सिस्टीममध्ये काही सॉफ्टवेअर जोडावे लागणार आहेत. यात काही अडचणी आल्या, तर बिलांना विलंब होणे क्रमप्राप्तच आहे.
मोबाइल बिले मिळण्यास जीएसटीमुळे विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 4:20 AM