मुंबई : अमेरिकी सरकारच्या अर्थकारणाशी निगडीत अशा ट्रेझरी बॉरोईंग अॅडव्हायझरी कमिटीमध्ये (टीबीएससी) डॉ. अजय राजाध्यक्ष या मराठी अर्थतज्ज्ञाची नियुक्ती झाली आहे. तेथील सरकारने त्यांना या समितीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे.
अमेरिकेच्या रोखेबाजारातील व्यवहारांसाठी व फेडरल रिझव्र्हला सल्ला धेण्यासाठी ही समिती काम करते. जगातील अव्वल दर्जाच्या वित्तीय संस्थांतील मुख्य अर्थतज्ज्ञ व हेज फंडांचे मुख्याधिकारी यांचा समावेश या समितीत प्राधान्याने असतो. त्यामुळे तिथे होणारी नियुक्ती हा जागतिक सन्मान मानला जातो. डॉ. अजय राजाध्यक्ष हे यामध्ये सहभागी होणारे एकमेव भारतीय ठरले असून पहिलीच मराठी व्यक्ती या निमित्ताने एका महत्वाच्या समितीत सहभागी होणार आहे.
वयाच्या 38 व्यावर्षी हा सन्मान त्यांना प्राप्त झाला असून या निमित्ताने जागतिक अर्थकारणातील तरुणांच्या मांदीयाळीतील त्यांचे स्थान या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. (प्रतिनिधी)
फायनान्स विषयात एमबीएचे पदव्युत्तर : मुंबईत वाढलेल्या डॉ. राजाध्यक्ष यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली असून 1999 साली आयआयएम कोलकाला येथून फायनान्स विषयात एमबीएचे पदव्युत्तर शिक्षण केले आहे. अमेरिकेतील विद्यापीठातून बिझनेस मास्टर्सची पदवीही घेतली आहे.