Lokmat Money > बिझनेस न्यूज > मार्चमध्ये देशातील उत्पादन घसरून ७ महिन्यांच्या नीचांकी

मार्चमध्ये देशातील उत्पादन घसरून ७ महिन्यांच्या नीचांकी

कोविड-१९ साथीमुळे मागणीत झाली माेठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 04:44 AM2021-04-06T04:44:50+5:302021-04-06T04:45:07+5:30

कोविड-१९ साथीमुळे मागणीत झाली माेठी घट

In March, the country's production fell to a seven-month low | मार्चमध्ये देशातील उत्पादन घसरून ७ महिन्यांच्या नीचांकी

मार्चमध्ये देशातील उत्पादन घसरून ७ महिन्यांच्या नीचांकी

नवी दिल्ली : भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रात मार्चमध्ये मोठी घसरण झाली आहे. या घसरगुंडीनंतर या क्षेत्रातील परचेर्स मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) सात महिन्यांच्या नीचांकावर पोहोचला आहे.  कोविड-१९ साथीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वस्तू उत्पादन क्षेत्रात घसरण झाली आहे. 

आयएचएस मार्किट इंडियाने जारी केलेल्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील ‘पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) मार्चमध्ये घसरून ५५.४ वर आला आहे. फेब्रुवारीत तो ५७.५ होता. घसरण झाली असली तरी हे क्षेत्र अजूनही वृद्धीच्या कक्षेत आहे.  ५० वरील पीएमआय वृद्धी, तर ५०च्या खालील पीएमआय घसरण दर्शवितो.

आयएचएस मार्किटच्या आर्थिक सहयोगी संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, उत्पादन, नवीन ऑर्डर्स आणि कच्च्या मालाची खरेदी यातील वृद्धी सौम्य झाली आहे. कोविड-१९ साथीमुळे मागणीत घसरण झाल्याचे संकेत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी दिले आहेत. किमतीच्या दबावामुळे कच्च्या मालाच्या खरेदीत कपात झाली आहे. कोविड-१९ निर्बंध विस्तारित करण्यात आले आहेत. काही राज्यांत लॉकडाऊन उपाययोजना पुन्हा लागू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये भारतीय वस्तू उत्पादन क्षेत्राला नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल, असे दिसते.

रोजगारातही झाली घसरण
सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, मार्चमध्ये रोजगारातही घसरण झाली आहे. कामगारांची संख्या घटली असली तरी शिलकी कामात अल्पशी वाढ झाली आहे. त्यातून मागणीत झालेली घसरण स्पष्ट होते. 
मार्चमध्ये व्यावसायिक आत्मविश्वासही घटला आहे. गेल्या तीन वर्षांत कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र त्या तुलनेत कंपन्यांनी उत्पादनांच्या किमती वाढविलेल्या नाहीत. 

Web Title: In March, the country's production fell to a seven-month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.