मुंबई : शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये झालेल्या नवीन उच्चांकामुळे बाजारात नफा कमविण्यासाठी मोठी विक्री झाली. परिणामी शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये काहीशी घट झालेली दिसून आली. तरीही निफ्टीने मात्र बंद मूल्याचा उच्चांक नोंदविला, हे विशेष होय. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये सकाळपासूनच घसरण सुरू होती. हा निर्देशांक ४४,१६९.९७ अंशांपर्यंत खाली घसरला होता. मात्र नंतर त्यात काहीशी सुधारणा होऊन तो ४४,६१८.०४ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ३७.४० अंशांची घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४.७० अंशांनी वाढून १३,११३.७५ अंशांवर बंद झाला. निफ्टीचा हा बंद मूल्याचा उच्चांक आहे.
या सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार असल्याने बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा कमविला.
याेगींनी दिली शेअर बाजाराला भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी मुंबई शेअर बाजाराला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमध्ये लखनाै महापालिकेने उभारलेल्या बॉण्ड्सची नोंदणी शेअर बाजारात करण्यात आली. आता या बॉण्ड्सची बाजारामध्ये खरेदी-विक्री करता येणार आहे.