Meta Layoffs : तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार आहे. वृत्तानुसार, सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पुढील आठवड्यात ३,६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. यामध्ये विविध देशातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. मेटाने अलीकडेच कमी कामगिरी करणाऱ्यांपैकी ५% टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली होती. म्हणजे अपेक्षेप्रमाणे काम न करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. यात भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणार का?
कोणत्या देशाला बसणार फटका
अहवालानुसार, सोमवारीपासून अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ही नोकरकपात करण्यात येणार आहे. दुसरीकडे जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्स सारख्या देशांमध्ये कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कारण त्यांचे स्थानिक कामगार कायदे त्याची अंमलबजावणी करण्यास परवानगी देत नाहीत. त्याचबरोबर युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यान कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहेत.
मेटा नोकरकपात का करत आहे?
मेटाने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेमोमधून नोकर कपातीचे कारण समोर आलं आहे. कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांची भरती करण्याची प्रक्रिया वेगवान करणार असल्याचे त्यात स्पष्ट केलं आहे. मॉनेटायझेशन टीमचे उपाध्यक्ष पेंग फॅन यांनी कर्मचाऱ्यांना नवीन भरतीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. यावेळची नोकर कपात वेगळी असणार आहे. कंपनीने म्हटले आहे की या कालावधीत कार्यालये सुरू राहतील. पूर्वीसारखे कोणतेही अपडेट दिले जाणार नाहीत. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना थेट नोटीस पाठवली जाणार असून कंपनी यावर उत्तर देण्यास बांधील राहणार नाही.
अमेरिकेत रोजगाराच्या संधी कमी
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेतील नोकरीच्या संधी डिसेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी होऊन तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने मंगळवारी जारी केलेल्या JOLTS अहवालानुसार, उपलब्ध नोकऱ्यांची संख्या नोव्हेंबरमधील ८.१६ दशलक्ष वरून डिसेंबरमध्ये ७.६० दशलक्ष इतकी घसरली आहे.