न्यूयॉर्कः जगभरातील कोट्यवधी तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या 'फेसबुक' या सोशल नेटवर्किंग कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्गने श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या वॉरेन बफे यांना मागे टाकत, 34 वर्षीय झुकरबर्ग 'टॉप-3' मध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, श्रीमंतांच्या यादीतील अव्वल तिघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचेच संस्थापक आहेत.
अॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात धनाढ्य उद्योगपती आहेत, तर मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्कशायर हाथवेचे अध्यक्ष 87 वर्षीय वॉरेन बफे हे या यादीत तिसरे होते. परंतु, फेसबुकच्या समभागांनी 2.4 टक्क्यांची उसळी घेतल्यानं त्यांच्या जागी झुकरबर्ग विराजमान झाला आहे. झुकरबर्गची संपत्ती 81.6 अब्ज डॉलर्स इतकी आहे. बफे यांच्यापेक्षा झुकरबर्गची संपत्ती 373 दशलक्ष डॉलर्सने जास्त आहे.
काही महिन्यांपूर्वी डेटा चोरी प्रकरणी फेसबुकची जगभरात नाचक्की झाली होती. मार्क झुकरबर्गला जाहीर माफीही मागावी लागली होती. स्वाभाविकच, फेसबुकचे शेअर गडगडले होते. परंतु, गुंतवणूकदारांनी कंपनीवर पुन्हा विश्वास दाखवल्यानं झुकरबर्गला 'अच्छे दिन' आले आहेत. वॉरेन बफे यांनी बर्कशायर हाथवे कंपनीचे ब श्रेणीचे 290 दशलक्ष समभाग दान केलेत. त्यापैकी मोठा वाटा त्यांनी गेट्स फाउंडेशनला दिलाय. त्यामुळे त्यांच्याकडील संपत्ती कमी झाल्याचं जाणकारांनी सांगितलं.