मुंबई : आसाम म्हटले की अस्वस्थ, अशांत प्रदेश असल्याची भावना निर्माण होते. आसाम हे आसियान देशांचे प्रवेशद्वार असल्याने, ही बाजारपेठ ८० कोटी ग्राहकांची आहे. त्यामुळे तेथे गुंतवणुकीसाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले.
आसाममध्ये ईशान्य भारतातील पहिली गुंतवणूक परिषद फेब्रुवारीत होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईत सोनोवाल यांनी ही माहिती दिली. आसामहून म्यानमार, थायलंड, बँकॉक, कम्बोडिया हा आसियानचा प्रदेश रस्त्याने जोडला गेला आहे. या प्रदेशांत ५९ कोटी ग्राहक आहेत. बांगलादेशही लागून असून, तेथे १६ कोटी तर ईशान्य भारतात पाच कोटी ग्राहक आहेत. यामुळे आसामात गुंतवणूक करणाºयांना देशाच्या अन्य प्रदेशात जाण्याची गरजदेखील नाही. त्यांच्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असेल. ईशान्येकडील राज्यांसाठी केंद्र सरकारने पहिल्यांदाच २ लाख कोटी रुपये दिले आहेत. त्यातून दळणवळणाच्या सुविधा उभ्या होत आहेत. हे ध्यानात घेऊनच आम्ही उद्योजकांना आमंत्रित करीत आहोत.
आसामचे अतिरिक्त मुख्य सचिव रवी कुमार म्हणाले की, वर्षभरात ६५०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यात नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. आता कृषी व अन्न प्रक्रिया, हातमाग व वस्त्रोद्योगसह अनेक क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित केले आहे.
‘अस्फा’बाबत मौन
आसाम आता शांत असून, १६ महिन्यांत एकही चकमक झाली नसल्याचा दावा सोनोवाल यांनी केला. मात्र सोनोवाल यांनीच ‘आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट’ (अस्फा) चा उपयोग करीत आसामला अशांत घोषित केले आहे. तसे असताना गुंतवणूकदार येणार कसे? या ‘लोकमत’च्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. महाराष्टÑाने आम्हाला गुंतवणुकीसाठी मदत करावी, एवढेच उत्तर त्यांनी दिले.
आसामद्वारे ८० कोटी ग्राहकांची बाजारपेठ - सर्वानंद सोनोवाल
आसाम म्हटले की अस्वस्थ, अशांत प्रदेश असल्याची भावना निर्माण होते. आसाम हे आसियान देशांचे प्रवेशद्वार असल्याने, ही बाजारपेठ ८० कोटी ग्राहकांची आहे. त्यामुळे तेथे गुंतवणुकीसाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:58 AM2017-11-30T00:58:23+5:302017-11-30T00:59:50+5:30