Join us

संमिश्र वातावरणात बाजाराची आगेकूच; जगातील अर्थव्यवस्था वाढू लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 3:57 AM

गतसप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदविले. मात्र त्यानंतर नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे हे दोन्ही निर्देशांक खाली आले.

प्रसाद गो. जोशी

कोरोनाची लस येण्याला होत असलेला विलंब आणि त्यामधील अनिश्चितता, जगभरामध्ये वाढत असलेले रुग्ण, त्यामुळे पुन्हा लॅाकडाऊनची शक्यता अशी निराशाजनक स्थिती असतानाही परकीय वित्तसंस्थांच्या जोरदार खरेदीमुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उच्चांक केले. त्यातच शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झालेली  एकूण देशांतर्गत उत्पादन आणि पीएमआयची आकडेवारी ही आगामी सप्ताहात बाजाराच्या वाढीला हातभार लावणारी ठरण्याची शक्यता आहे. 

गतसप्ताहामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन उच्चांक नोंदविले. मात्र त्यानंतर नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे हे दोन्ही निर्देशांक खाली आले. निफ्टी आता १३ हजारांच्या जवळ असला तरी ती पातळी त्याला राखता आली नाही. एफ ॲण्ड ओची सौदापूर्ती तेजीमध्ये  झाल्याने आगामी काळात बाजारात तेजी राहण्याचा अंदाज आहे. भारतामध्ये पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी अर्थव्यवस्थेची वाढ चांगली होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून परकीय वित्तसंस्थांकडून मोठी गुंतवणूक भारतामध्ये होत आहे. 

नोव्हेंबर महिन्यामध्ये परकीय गुंतवणूकदारांनी ६५,३१७.१३ कोटी रुपये भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतविले आहेत. आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. यामधून भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचा विश्वासच व्यक्त होत आहे. सरकारनेही परकीय गुंतवणूक अधिकाधिक यावी , यासाठीचे आपले प्रयत्न वाढविले आहेत.

जगातील अर्थव्यवस्था वाढू लागल्याजगभरातील अर्थव्यवस्था आता रुळावर येऊ लागल्या आहेत. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीमध्ये नोंदविलेली ८.५ टक्क्यांची वाढ, त्याचप्रमाणे अमेरिकन आणि चीनच्या अर्थव्यवस्थांनीही अनुक्रमे केलेली ३.२ आणि ४.९ टक्के वाढ यामुळे आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसत आहे. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये ७.५ टक्क्यांची घट झाली असली तरी मागील तिमाहीच्या तुलनेत ( २३.९ टक्क्यांची घट ) ही कामगिरी सुधारल्याचे दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्था आगामी दोन तिमाहींमध्ये आणखी वेग घेण्याची अपेक्षा आहे. तसेच अन्य देशांच्या अर्थव्यवस्थाही वाढ दाखवू शकतात.

आगामी सप्ताहआगामी सप्ताहामध्ये शेअर बाजार वाढण्याची शक्यता असली तरी नफा कमाविण्यासाठी काही प्रमाणात विक्रीचीही शक्यता वर्तविली जात आहे. विक्रीच्या प्रमाणात बाजार खाली येणे शक्य आहे. मात्र जागतिक वातावरण आणि कोरोना लसीची प्रगती यावर बाजाराची वाटचाल कशी होणार ते अवलंबून राहणार आहे. 

टॅग्स :शेअर बाजार