Join us

व्यापार युद्ध लांबल्याने बाजारात पुन्हा तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 6:30 AM

अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या ३०० अब्ज डॉलर्स आयातीवरील १० टक्के अतिरिक्त शुल्काची आकारणी सप्टेंबरऐवजी डिसेंबरपासून करण्याचे ठरविल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारांसहित भारतीय बाजारात बुधवारी तेजी होती.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या ३०० अब्ज डॉलर्स आयातीवरील १० टक्के अतिरिक्त शुल्काची आकारणी सप्टेंबरऐवजी डिसेंबरपासून करण्याचे ठरविल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारांसहित भारतीय बाजारात बुधवारी तेजी होती.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५४ अंकानी वधारून ३७,३११ वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी १०३ अंकांनी वाढून ११,०२९ अंकांवर बंद झाला. उद्या शेअर बाजारांना स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहे. त्यामुळे शुक्रवारीही ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.व्यापार युद्धाशिवाय बाजारात तेजी येण्यासाठी आणखी तीन घटना कारणीभूत आहेत. त्या म्हणजे महागाई दरात घसरण, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होणे व सरकारने विदेशी गुंतवणूकदारांच्या उत्पन्नावरील अधिभाराचा पुनर्विचार करण्याचे दिलेले आश्वासन या आहेत.रिझर्व्ह बँकेने घाऊक महागाईचा दर जुलैअखेर ४ टक्के असेल व किरकोळ महागाईचा दर ४.५० टक्के असल्याचे अनुमान जाहीर केले होते, परंतु प्रत्यक्षात हे दोन्ही दर अनुक्रमे ३.१५ व ४.१४ टक्के इतके राहिले. त्यामुळे रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता बळावली आहे.प्राप्तिकरावरील अधिभाराचाही पुनर्विचारव्यापार युद्ध टळल्यामुळे नाणे बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयासुद्धा वधारला. मंगळवारी रुपया ६२ पैशांनी घसरून ७१.४० रुपये प्रति डॉलर या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. तो आज ५५ पैशांनी मजबूत होऊन ७०.८५ प्रति डॉलरवर स्थिरावला.अर्थसंकल्पात सरकारने दोन ते पाच कोटी उत्पन्नावरील प्राप्तिकर ३९ टक्के व ५ कोटींवरील दर ४३ टक्के केला होता. हे दर लागू झाल्याने विदेशी गुंतवणूकदारांच्या न्यासांनी आपली गुंतवणूक शेअर बाजारातून काढून घ्यायला सुरुवात केली होती. परिणामी, एका महिन्यात मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४,००० अंकांनी घसरला होता.च्हे टाळण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात लावलेला प्राप्तिकरावरील अधिभाराचा पुनर्विचार करण्याचे कालच जाहीर केले. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर)वरील कंपन्यांचा खर्च करमुक्त करून, या विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या सर्व घटनांचा सकारात्मक परिणाम होऊन आज शेअर बाजारात तेजी आली आहे.

टॅग्स :शेअर बाजारअर्थव्यवस्था