- प्रसाद गो. जोशी
येत्या सप्ताहामध्ये अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीतील मिनिटस जाहीर होणार असून, जपानमधील चलनवाढीची आकडेवारीही जाहीर होणार आहे. या दोन्हीकडे बाजाराची नजर असून या जोडीलाच परकीय वित्तसंस्थांची भूमिका आणि खनिज तेलाचे दर यावर बाजाराची वाटचाल अवलंबून राहणार आहे.
अमेरिकेमध्ये मंदी येण्याची शक्यता कमी होऊ लागल्याने गतसप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजारात चांगली वाढ झाली. त्यामुळेच दोन सप्ताहांपासून बाजारात सुरू असलेली घसरण थांबली आहे. गतसप्ताहात सेन्सेक्स ३७३०.९३ अंशांनी वाढून ८०,४३६.८४ अंशांवर तर निफ्टी २४,५४१.१५ अंशांवर बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही वाढ झाली आहे.
येत्या सप्ताहामध्ये अमेरिकेतील घटनांकडे गुंतवणूकदार बारकाईने बघत आहेत. अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीतील मिनिटस जाहीर होतील. त्याचप्रमाणे बेरोजगारी, गृहखरेदीचे आकडेही जाहीर होतील. त्यावरून एकूणच अमेरिकेच्या बाजारपेठेचा अंदाज येणार आहे.
जपानमधील चलनवाढीची आकडेवारी सकारात्मक असण्याची आशा आहे. याशिवाय भारतामधील परचेस मॅनेजर्स इंडेक्सची आकडेवारी या सप्ताहामध्ये जाहीर होणार आहे.
परकीय वित्तसंस्थांची विक्री सुरूच
बाजारात परकीय वित्तसंस्थांकडून चालू महिन्यात विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गतसप्ताहामध्ये या संस्थांनी ८,६१६ कोटींची विक्री केली. ऑगस्टमध्ये या संस्थांनी आतापर्यंत २८,९७७ कोटींचे समभाग विकले. दुसरीकडे देशांतर्गत वित्तसंस्था हा खड्डा भरून काढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.