प्रसाद गो. जोशी
येत्या सप्ताहात जाहीर होणारी अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेबाबतची महत्त्वाची आकडेवारी, कंपन्यांचे तिमाही निकाल, परकीय वित्तसंस्थांचे धोरण यावरच बाजाराचा रोख ठरणार असून आगामी निवडणुकीच्या पूर्वीची तेची बाजारात अवतरली असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. आगामी सप्ताहात बाजारात तेजी राहण्याचीच चिन्हे आहेत.
याशिवाय युरोपमधील चलनवाढ व पीएमआयची आकडेवारीही बाजारावर परिणाम घडवू शकते. भारतामधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी दि. २२ रोजी जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे काही कंपन्यांचे तिमाही निकालही जाहीर होतील, त्याचाही प्रभाव बाजारावर पडू शकतो.
महत्त्वपूर्ण कंपन्यांच्या निकालाकडे लक्ष
गत सप्ताहामध्ये चलनवाढीची आकडेवारी आशादायक नसली तरी दिलासा देणारी आहे. आधीच्या महिन्यापेक्षा चलनवाढ घटली असली तरी ती अद्याप ४ टक्क्यांपेक्षा वरच असल्याने थोडी चिंता व्यक्त होत आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल संपत आले असले तरी काही कंपन्यांच्या निकालाचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.
काही संस्थांचे जाहीर झालेले निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे निकाल हे भाजपच्या आघाडीला चांगल्या जागा दाखवित असल्याने बाजारात बल्ले बल्ले सुरू आहे. सध्याची तेजी ही निवडणूकपूर्व तेजी असल्याचे काही तज्ज्ञ मानतात. ही तेजी फार तर दोन सप्ताह राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा आठवडा बाजारासाठी सकारात्मक राहील.
परकीय वित्तसंस्थांनी केली जोरदार विक्री
अमेरिकेमधील बॉण्डसवरील परतावा वाढल्याने परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात भारतीय बााजारात शेअर्सची विक्री करून पैसा अमेरिकेकडे वळविला आहे. या संस्थांनी गत सप्ताहामध्ये ६२३८ कोटी रुपयांचे समभाग विकले.
चालू महिन्यातील या संस्थांची विक्री ३९२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. देशांतर्गत वित्तसंस्था मात्र इमाने इतबारे खरेदी करीत आहेत. या संस्थांनी गतसप्ताहात बाजारात ८७३२ कोटी रुपये गुंतविले आहेत.
फेब्रुवारी महिन्यातील या संस्थांची गुंतवणूक १७,४०० कोटी रुपयांवर गेली आहे. दरम्यान, गत सप्ताहात बाजार वाढल्यामुळे गुंतवणूकदार ३ लाख १७ हजार ४८.९५ कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.