Join us

बाजार निर्देशांकांनी गाठला वर्षभरातील उच्चांक

By admin | Published: September 12, 2016 1:09 AM

युरोपियन बॅँकेने कायम राखलेले व्याजदर, त्यापाठोपाठ अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची कमी झालेली शक्यता, यामुळे सप्ताहाच्या अखेरीस विक्री होऊनही बाजारातील सकारात्मक वातावरण कायम राहिले

प्रसाद गो. जोशीयुरोपियन बॅँकेने कायम राखलेले व्याजदर, त्यापाठोपाठ अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची कमी झालेली शक्यता, यामुळे सप्ताहाच्या अखेरीस विक्री होऊनही बाजारातील सकारात्मक वातावरण कायम राहिले. तत्पूर्वी शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी वर्षभरातील उच्चांक गाठला होता. परकीय वित्तसंस्थांची कायम असलेली खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची आगेकूच यानेही बाजाराच्या वाढीला हातभार लावला.सोमवारी बाजाराला गणेश चतुर्थीची सुट्टी असल्यामुळे केवळ चारच दिवस बाजारात व्यवहार झाले. यापैकी दोन दिवस निर्देशांक वाढला, तर दोन दिवस घसरला. मात्र, घसरणीपेक्षा वाढीचा वेग अधिक असल्याने बाजारात तेजी होती, असे म्हणणे चुकीचे ठरणारे नाही. सप्ताहात संवेदनशील, तसेच निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी वर्षभरातील (५२ सप्ताहांमधील) उच्चांकी धडक मारली. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी विक्रीचा जोर वाढल्याने निर्देशांकांमधील ही वाढ कमी झाली. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६५.१४ अंश म्हणजेच, ०.९३ टक्क््यांनी वाढून २८७९३.२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८८६६.७० अंशांवर बंद झाला. यामध्ये ५७.०५ अंश म्हणजेच ०.६५ टक्क््यांनी वाढ झाली आहे. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी आॅगस्ट महिन्यातील अमेरिकेमधील रोजगाराच्या स्थितीबाबतची आकडेवारी जाहीर झाली. रोजगारामध्ये अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नसल्याने बाजारावर निराशेचे सावट आले. परिणामी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून चालू महिन्यात व्याजदरामध्ये वाढ होण्याची शक्यता धूसर झाली आणि बाजारावर विक्रीचा मारा झाला. वाढीव किमतींचा फायदा घेत काही प्रमाणात नफा कमविण्याचे धोरणही काही गुंतवणूकदारांनी राबविलेले दिसून आले. या आधीच युरोपियन मध्यवर्ती बॅँकेने सध्याचे व्याजदर कायम राखण्याचा निर्णय जाहीर केला होता. परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवलेले गतसप्ताहातही दिसून आले. सप्ताहभरात या संस्थांनी १९५१०.२६ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले, तर १६८७३.४५ कोटी रुपयांचे समभाग विकले. म्हणजेच, या संस्थांनी सप्ताहामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये २६३६.८१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. भारतीय चलन रुपयाही सप्ताहामध्ये २९ पैशांनी वाढला. आॅगस्ट महिन्यामध्ये भारताच्या सेवाक्षेत्रातील वाढीचा दर गेल्या साडेतीन वर्षांमधील सर्वाेच्च असल्याचे जाहीर झाल्याने बाजारात खरेदीदारांची झुंबड उडाली. यामुळेच निर्देशांकांना वर्षभरातील उच्चांक गाठता आला. दोन अपवाद वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.