Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाढत्या महागाईने रोखले बाजाराचे निर्देशांक

वाढत्या महागाईने रोखले बाजाराचे निर्देशांक

जीवनाश्यक वस्तूंचे दर चढे असल्याने चलनवाढीचा निर्देशांक वाढून त्याने गाठलेला दोन वर्षांतील उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 05:16 AM2016-08-22T05:16:14+5:302016-08-22T05:16:14+5:30

जीवनाश्यक वस्तूंचे दर चढे असल्याने चलनवाढीचा निर्देशांक वाढून त्याने गाठलेला दोन वर्षांतील उच्चांक

Market Indexes Preventing Inflation | वाढत्या महागाईने रोखले बाजाराचे निर्देशांक

वाढत्या महागाईने रोखले बाजाराचे निर्देशांक


जीवनाश्यक वस्तूंचे दर चढे असल्याने चलनवाढीचा निर्देशांक वाढून त्याने गाठलेला दोन वर्षांतील उच्चांक आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दल लागलेल्या चिंतेचा परिणाम शेअरबाजार निर्देशांकाच्या घसरणीत झाला. असे असले, तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीनंतरही परकीय वित्तसंस्थांची खरेदी कायम असल्याने बाजाराच्या घसरणीचे प्रमाण काहीसे कमी राहिले.
गतसप्ताहात बाजारात चारच दिवस व्यवहार झाले. सप्ताहभरामध्ये मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ७५.४० अंश म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी घसरून २८०७७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५.२५ अंश म्हणजेच ०.०६ टक्के असा किरकोळ कमी झाला. सप्ताहाअखेरीस हा निर्देशांक ८६७२.१५ अंशांवर बंद झाला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र सप्ताहामध्ये वाढ झालेली दिसून आली. या दोन्ही निर्देशांकांतील समभागांना बाजारात मोठी मागणी असल्याचे दिसून आले. बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ३.५५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दरही ६.०७ टक्के असा झाला आहे. या दोन्ही निर्देशांकांनी दोन वर्षांतील उच्चांक गाठला. भारतीय बाजारात परकीय वित्तसंस्था या सातत्याने खरेदी करताना दिसत आहेत. गतसप्ताहात या संस्थांनी २३०९.५० कोटी रुपयांचे समभाग, तसेच ५६४.७३ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. सलग २७ दिवस परकीय वित्तसंस्था बाजारात खरेदी करताना दिसत आहेत. आशियातील तैवान आणि दक्षिण कोरियानंतर या वित्तसंस्थांनी भारताला खरेदीसाठी तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली. एसबीआयने ३ सहयोगी बँकांचे विलिनीकरण करण्याला मंजुरी दिली. यामुळे स्टेट बँकेचा बाजारातील वाटा कमी होणार असला, तरी भारतातील बँकिंग क्षेत्रातील विलिनीकरणाची प्रक्रिया गतिमान होऊन, बँका अधिक मजबूत होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. सप्ताहाच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ऊर्जित पटेल यांच्या नावाची घोषणा झाली. या निर्णयाला बाजार कसा प्रतिसाद देतो, ते आगामी सप्ताहात दिसेल.

Web Title: Market Indexes Preventing Inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.