- प्रसाद गो. जोशीसप्ताहाच्या पूर्वार्धातील अनुकूल वातावरण उत्तरार्धामध्ये प्रतिकूल बनल्याने बाजारात घसरण झाली असली तरी सप्ताहाचा विचार करता निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. वाढलेली आर्थिक तूट, रुपयाची गटांगळी, इंधनाचे वाढते दर, आंतरराष्टÑीय बाजारांमधील मंदी अशा अडथळ्यांना पार करीत निर्देशांक वधारले हेच खूप! पहिल्या तिमाहीत वाढलेला विकास दर ही आगामी सप्ताहासाठी खूषखबर ठरू शकेल.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताह तेजीचाच राहिला. सप्ताहाचा प्रारंभ ३८४७२.०३ वाढीव पातळीवर झाला. त्यानंतर संवेदनशील निर्देशांकाने ३८९८९.६५ ते ३८४१६.७३ अंशांदरम्यान हेलकावे घेतले. सप्ताहाच्या अखेरीस तो ३८६४५.०७ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात ३९३.२७ अंशांनी वाढ झाली.राष्टÑीय शेअर बाजारामध्येही सप्ताहात वाढ झालेली दिसून आली. येथील निर्देशांक (निफ्टी) १२३.४० अंशांनी वधारून ११६८०.५० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांकही वाढीव पातळीवर बंद झाले. मिडकॅप १६८८१.३३ (+३२८.५९) अंशांवर तर स्मॉलकॅप १७०९५.९६ (+२३१.५३) अंशांवर बंद झाले. स्मॉलकॅपमध्ये पुन्हा तेजी अनुभवावयास मिळत असल्याने बाजारात उत्साह आहे.सप्ताहात रुपयाने डॉलरच्या तुलनेत ७१ रुपये अशी नवी नीचांकी गटांगळी घेतली आहे. डॉलरची वाढती मागणी आणि रुपयाची किंमत सावरण्यासाठी हस्तक्षेपाला रिझर्व्ह बॅँकेने दिलेला नकार यामुळे ही घट झाली. पहिल्या तिमाहीमध्ये आर्थिक तूट ५.४० लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याने आर्थिक गणित बिघडण्याची भीती आहे. पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ८.२ टक्कयांवर पोहोचला असून तो सध्या सर्वाधिक आहे. याचा फायदा आगामी सप्ताहात बाजारात दिसू शकेल.चीनमध्ये उत्पादन वाढले असले तरी व्यापार युद्धामध्ये अमेरिका त्यांच्या उत्पादनांवर नव्याने कर लादणार असल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदीचे वातावरण दिसले.टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य ८ लाख कोटी रुपयांवरदेशातील अव्वल क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान आस्थापना असलेल्या टीसीएसने आपले बाजार भांडवल मूल्य ८ लाख कोटी रुपयांवर पोहोचविले आहे. हा टप्पा गाठणारी ही पहिलीच आस्थापना आहे. शुक्रवारी टीसीएसने रिलायन्सला अव्वल स्थानावरून हटवत नवीन विक्रमाची नोंद केली आहे.मुंबई शेअर बाजारामध्ये अस्थिर वातावरणामध्ये टीसीएसच्या समभागांनी २०९०.५० रुपये अशी आतापर्यंतची सर्वाेच्च किंमत मिळविली. यामुळे या आस्थापनेचे एकूण बाजार भांडवल ८ लाख ३६३.६४ कोटी रुपयांवर पोहोचले. त्यामुळे ८ लाख कोटी रुपयांवर बाजार भांडवल मूल्य असलेली पहिली भारतीय आस्थापना बनण्याचा मान टीसीएसला मिळाला आहे.टाटा उद्योग समुहातील या आस्थापनेला ५० वर्षे झाली असून भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगात तिची उलाढाल सर्वाधिक आहे.
अडथळ्यांच्या शर्यतीतही बाजार निर्देशांक वधारले; विकासदर फायद्याचा ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 1:48 AM