मुंबई - गेल्या महिनाभरात भारतीय शेअर बाजारात माेठे उतारचढाव दिसून आले. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली. त्यातच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात विक्रीचा मारा करत भारतातून माेठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतला. परिणामी शेअर बाजारातील एकूण भांडवली मूल्य घसरले आहे. याबाबतीत भारताची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.
‘सेबी’ने मागितला अदानी समूहाच्या कर्जाचा तपशील
बाजार नियामक सेबीने क्रेटिड रेटिंग संस्थांकडे अदानी समूहातील कंपन्यांच्या कर्जाची तसेच रोख्यांच्या मानकांची माहिती मागितली आहे. सेबीने मानक संस्थांना सर्व थकीत मानांकने, अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चा आणि आपला दृष्टिकोन याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. २५ जानेवारीपासून आतापर्यंत समूहाचे समभाग ७८ टक्के घसरले आहेत. त्यामुळे समभागांतील सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे अदानी समूहाची सध्याची भांडवली स्थिती काय आहे तसेच कर्जाची परतफेड करण्याच्या कंपनीच्या क्षमतेवर काही परिणाम झाला आहे का, याची माहिती सेबीला जाणून घ्यायची आहे. वास्तविक यातील बहुतांश माहिती आधीच सार्वजनिक आहे.सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ एसअँडपी आणि मूडीज यांसारख्या विदेशी मानक संस्थांनीच अदानी समूहाच्या मानांकनात कपात केली आहे. भारतीय मानक संस्थांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अदानी समूह आपल्या भांडवली खर्चाचा आढावा घेईल, असे भारतीय मानक संस्थांना वाटते.
अदानी पॉवरसोबतचा करार ओरियंट सिमेंटने केला रद्द
दरम्यान, सीके बिर्ला समूहातील एक कंपनी ओरियंट सिमेंटने अदानी पॉवरसोबतचा महाराष्ट्रातील एक करार रद्द केला आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला बसलेला हा तिसरा मोठा झटका आहे.