- प्रसाद गो. जोशी
अपेक्षेनुसार आलेले कंपन्यांचे तिमाही निकाल, त्यामुळे वाढत असलेले समभाग, कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी नवीन विषाणूची कमी झालेली भीती आणि देशांतर्गत वित्तीय संस्थांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे शेअर बाजाराने सलग चौथ्या सप्ताहामध्ये वाढीव पातळीवर मजल मारली आहे. येत्या सप्ताहात बाजाराचे प्रमुख निर्देशांक नवीन उच्चांकी पातळी गाठतील का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
बाजारामध्ये चांगली वाढ झालेली असल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी विक्री सुरू केली. गतसप्ताहात या संस्थांनी ४००२.९४ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. देशांतर्गत वित्तसंस्था खरेदीच्या मूडमध्ये होत्या.
६.१९ लाख कोटींनी वाढले बाजार भांडवलमूल्य
गतसप्ताहामध्ये बाजारात सुमारे २ टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामुळे बाजारात नोंदविलेल्या कंपन्यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये ६.१९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
७ जानेवारी रोजी असलेले २,७२,३४,६८०.७३ कोटी रुपयांचे भांडवलमूल्य १४ जानेवारी रोजी २,७८,५४,०८५.७८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याचाच अर्थ सप्ताहामध्ये त्यात ६,१९,४०५.०५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याआधीही दोन सप्ताह ते वाढले.
गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक बंद मूल्य फरक
सेन्सेक्स ६१,२२३.०३ १४७८.३८
निफ्टी १८,२५५.७५ ४४३.०५
मिडकॅप २६,०८५.२४ ६१२.४१
स्मॉलकॅप ३०,९५१.२८ ९१९.१४
कोरोनाच्या नवीन विषाणूची स्थिती आणि विविध कंपन्यांचे जाहीर होणारे निकाल यावरच आगामी सप्ताहात बाजाराची वाटचाल कशी राहणार ते ठरेल.
येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच क्षेत्रांच्या समभागांमध्ये सध्या तेजी आली असून, या सप्ताहामध्ये ती कायम राहण्याचा अंदाज आहे.
बाजाराची नजर आता नवीन उच्चांकाकडे
येत्या सप्ताहात बाजाराचे प्रमुख निर्देशांक नवीन उच्चांकी पातळी गाठतील का? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:50 AM2022-01-17T05:50:02+5:302022-01-17T05:50:19+5:30