Join us

उत्तम वातावरणात बाजाराची आगेकूच

By admin | Published: October 25, 2015 10:28 PM

आंतरराष्ट्रीय बाजारातील अनुकूल वातावरण, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने दिलेला अहवाल आणि रिलायन्सचे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आलेले

आंतरराष्ट्रीय बाजारातील अनुकूल वातावरण, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने दिलेला अहवाल आणि रिलायन्सचे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आलेले तिमाही निकाल या जोरावर मुंबई शेअर बाजार सलाग चौथ्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला. सुट्यांमुळे बाजारात कमी दिवस व्यवहार झाले.मुंबई शेअर बाजाराला दसऱ्याची एक दिवस सुटी असल्याने गतसप्ताहात अवघे चारच दिवस व्यवहार झाले. यापैकी दोन दिवस निर्देशांक खाली आला तर दोन दिवस तो वर गेलेला दिसून आला. मात्र घसरणीपेक्षा वाढ मोठ्या प्रमाणावर असल्याने सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक हिरव्या रंगामध्ये बंद झाला. निर्देशांक वाढीव पातळीवर बंद होण्याचा हा सलग चौथा सप्ताह आहे.मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाला वाढीव पातळीवर प्रारंभ झाला. त्यानंतर हा निर्देशांक २७५५५ ते २७१९० अंशांच्या दरम्यान खाली वर होत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २७४७०.८१ अंशांवर स्थिरावला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये २५६.२१ अंश म्हणजे ०.९४ टक्के एवढी वाढ झाली आहे. गेल्या चार सप्ताहांमध्ये निर्देशांक १६७०.३१ अंशांनी वाढला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही ५७.३० अंशांनी वाढ होऊन तो ८२९५.४५ अंशांवर बंद झाला.बाजारतील महत्वाचा घटक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज या आस्थापनेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सप्ताहाच्या प्रारंभीच जाहीर झाले. बाजाराच्या अपेक्षेहून हे निकाल चांगले आल्याने सोमवारी बाजारामध्ये चांगली वाढ झालेली दिसून आली. अन्य आस्थापनांचे निकालही चांगले येण्याची अपेक्षा बाजार बाळगून असून त्याच्याच जोरावर काही प्रमाणात वाढ होत आहे.युरोपियन सेंट्रल बॅँकेच्या झालेल्या बैठकीत प्रोत्साहन पॅकेज देण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून आगामी सप्ताहात त्याची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. यामुळे युरोप व अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये तेजी असलेली दिसून आली. याचा काही प्रमाणात प्रभाव भारतीय बाजारामध्येही दिसून आला आणि बाजार वाढला.गेल्या काही दिवसांपासून परकीय वित्तसंस्था भारतासह आशियातील अन्य बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. मागील सप्ताहातही या संस्थांनी मोठी गुंतवणूक केल्याने बाजाराच्या वाढीला हातभार लागला आहे. आॅक्टोबर महिन्यात या संस्थांनी आतापर्यंतच्या सहा महिन्यातील सर्वाधिक जुंतवणूक केली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.