प्रसाद गो. जोशी -
जगभरातील शेअर बाजारांमध्ये सारखे होत असलेले बदल हे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेण्यास भाग पाडत असल्याचे गत सप्ताहमध्ये दिसून आले. अखेरच्या दिवशी नफा कमविण्यासाठी झालेल्या विक्रीमुळे बाजार खाली आला असला तरी सप्ताहाचा विचार करता त्यामध्ये वाढच झाली. अपवाद राहिला तो मिडकॅप निर्देशांकाचा. असे असतानाही स्मॉलकॅप निर्देशांकाने गाठलेली २१ हजार अंशांची पातळी हा निश्चितच महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल. (Market Review: Small Cap 21,000 even in a cautious role)
अमेरिकेमध्ये बॉण्डवसर वाढत असलेला परतावा, कमी झालेला बेकारीचा दर यामुळे तसेच जाहीर झालेल्या कोरोना पॅकेजमुळे तेथे गुंतवणूक वाढत असून त्याचा फटका जगभरातील शेअर बाजारांना बसत आहे.
तसाच तो भारतीय बाजारातही विक्रीच्या रूपाने दिसून आला. मात्र, स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणूक त्यामानाने कमी जोखमीची भासत असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा त्याकडे वळला आहे. त्यामुळेच हा निर्देशांक चांगला वाढून त्याने २१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
मिडकॅपबाबत मात्र गुंतवणूकदार सावध आहेत. बाजारामध्ये खरेदीदार दोलायमान दिसून आले. त्यामुळे खरेदी आणि विक्रीच्या लाटा येताना दिसून आल्या.
परकीय वित्तसंस्थांची विक्री सुरुच
- मार्च महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारामध्ये विक्रीच केलेली दिसून येत आहे.
- १ ते १२ मार्च या कालावधीमध्ये या संस्थांनी ७०१३ कोटी रुपये काढून घेतले आहेत. चालू महिन्यामध्ये अमेरिकेतील बॉण्डवरील परतावा वाढल्याने भारतासह अन्य बाजारांमधून पैसे काढून घेण्याकडे परकीय वित्तसंस्थांचा कल आहे.
- या संस्थांनी शेअर बाजारातून ५३१ कोटी, तर बॉण्डमधून ६४८२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. त्याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामंध्ये या संस्थांनी भारतामध्ये मोठी गुंतवणूक केली होती.
सप्ताहातील स्थिती निर्देशांक बंद मूल्य बदल
सेन्सेक्स ५०,७९२.०८ +३८६.७६
निफ्टी १५,०३०.९५ +९२.८५
मिडकॅप २०,५७७.२१ - १०.५९
स्मॉलकॅप २१,२०९.०७ +७८०.६७
आगामी सप्ताहात वातावरणाकडे लक्ष
आगामी सप्ताहामध्ये शुक्रवारी जाहीर झालेली औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची आकडेवारी यावर बाजाराचा कल दिसून येईल. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये जाहीर होणारे व्याजदर व खनिज तेलाच्या किमती तसेच रुपयाच्या मूल्यामधील बदल यावर बाजाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
आठ कंपन्यांच्या भांडवलामध्ये वाढ
- शेअर बाजारातील १० प्रमुख कंपन्यांपैकी ८ कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये गतसप्ताहात ७२,४४२.८८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारतीय स्टेट बँकेच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये घट झालेली दिसून आली. इन्फोसिसच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये २४,९६२.९४ कोटी रुपयांची सर्वाधिक वाढ झाली आहे.
- त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागत आहे. एचडीएफसी, काेटक महिंद्र बँक, आयसीआयसीआय आणि हिंदुस्तान युनिलीव्हर यांचे बाजार भांडवलमूल्य वाढले आहे.