मुंबई: आज पुन्हा एकदा शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 500 अंकांनी घसरल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तर निफ्टीही 11 हजार अंकांच्या खाली आला आहे. बँकांच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळते आहे. आरबीएल, आयडीएफसी बँकांचे शेअर्स घसरले आहेत. याशिवाय इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्सचं मूल्य 11 टक्क्यांनी खाली आलं आहे. बँकांसोबतच ऑटोमोबाईल, फार्मा, आयटी कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्यदेखील घसरलं आहे.
एनबीएफसीमध्ये (रोख तरलता) घट:
वित्त संस्थांची रोख तरतला कमी झाल्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. वित्त संस्थांची कर्ज खाती बुडीत खात्यात जात असल्याच्या वृत्तामुळे शुक्रवारी अवघ्या 50 मिनिटांत सेन्सेक्स 1128 अंकांनी गडगडला होता. मात्र त्यानंतर सेन्सेक्स सावरला. यामुळे गुंतवणूकदारांचं 2 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. आजदेखील हाच ट्रेंड शेअर बाजारात पाहायला मिळाला. त्यामुळे इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, बजाज फायनान्स, एम अँड एम फायनान्शियलचे शेअर 3.5 ते 6 टक्क्यांनी खाली आले. हाऊसिंग लोन क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या एचडीएफसीच्या शेअर्समध्येही 4 टक्क्यांनी घसरण झाली.
खनिज तेलाचे वाढते दर: खनिज तेलाचे दर सतत वाढत आहेत. याशिवाय अमेरिकेनं इराणवर बहिष्कार घातला आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर बहिष्कार घालण्याची भूमिका ट्रम्प प्रशासनानं घेतली आहे. नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे खनिज तेलाचा दर प्रति बॅरल 90 डॉलरवर जाऊ शकतो. याचा प्रतिकूल परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
व्यापार युद्धाची भीती: चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरुच आहे. या दोन्ही देशांनी आज एकमेकांच्या काही वस्तूंवर नवे कर निर्बंध लादले आहेत. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील या व्यापार युद्धाचा फटका सर्व देशांना बसत आहे. या दोन्ही देशांकडून निर्बंध मागे घेतले जाण्याची शक्यता दिसत नसल्यानं शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.
परकीय गुंतवणूकदारांची पाठ: परदेशातील गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून मोठी गुंतवणूक काढून घेतली आहे. सप्टेंबरपासून परदेशातील गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल 15 हजार 365 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जागतिक बाजारात तणाव निर्माण झाल्यानं अनेकांनी गुंतवलेली रक्कम काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार
सेन्सेक्स 500 अंकांनी गडगडला; निफ्टी 11 हजाराच्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 01:16 PM2018-09-24T13:16:55+5:302018-09-24T13:18:18+5:30