- प्रसाद गो. जोशी
नवी दिल्ली- गेल्या काही महिन्यांपासून अतिशय जोमात वाढणा-या शेअर बाजाराला अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पाने तडाखा दिला आणि त्यानंतर बाजाराची घसरगुंडी झालेली बघायला मिळाली. संवेदनशील निर्देशांक ३५ हजारांची पातळी कशीबशी राखू शकला, तर निफ्टीही १०,७०० अंशांपर्यंत खाली आला. येत्या सप्ताहातील रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणावर आता बाजाराची नजर आहे.
शेअर बाजारात सप्ताहाची सुरुवात वाढीव पातळीवर झाली. त्यानंतर संवेदनशील निर्देशांक ३६४४३.९८ अंश असा उच्चांकी पोहोचला. पहिल्या दिवशी निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाला. त्यानंतर मात्र, रोज निर्देशांक खाली-खाली येत अखेरीस ३५०६६.७५ अंशांवर बंद झाला. आठवडाभरात निर्देशांक ९८३.६९ अंशांनी घसरला. निफ्टीमध्येही घसरण पाहायला मिळाली. हा निर्देशांक ३०९.०५ अंशांनी घसरून १०७६०.६० वर बंद झाला.
बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तर मोठी घसरण झाली. मिडकॅप निर्देशांक १२६६.४९ अंशांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक १४९४.६५ अंशांनी घरंगळले. ते अनुक्रमे १६५७४.७० व १७८४७.५३ अंशांवर बंद झाले. गेल्या काही महिन्यांपासून जोरदार वाढत असलेल्या शेअर बाजाराला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अर्थमंत्र्यांनी कोणत्याही अपेक्षांची पूर्तता न करता लागू केलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करामुळे बाजारात निरुत्साह दिसून आला. याशिवाय म्युच्युअल फंडाच्या लाभांशावरही कर लादला गेल्याने बाजाराची घोर निराशा झाली. यामुळे बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले. निर्देशांक ३६ हजार आणि ११ हजारांची पातळी राखू शकले नाहीत. बाजार घसरत असताना काही सरकारी वित्तसंस्थांनी खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोल ठरला. परकीय वित्तसंस्थांनी अखेरच्या दोन दिवसांमध्ये २,०४९ कोटी रुपयांची खरेदी केली.
>पाच वर्षांत आस्थापनांनी निर्मिले ३९ लाख कोटी
सन २०१२ ते १७ या पाच वर्षांच्या कालावधीत बाजारमूल्याचा विचार करता, देशातील पहिल्या १०० आस्थापनांनी ३८.९ लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली आहे. एका खासगी संस्थेने याबाबतचा अहवाल प्रकाशित केला असून, त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. टीसीएसने ५ वर्षांमध्ये २.५० लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण करून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सलग ५व्या वर्षी टीसीएस अव्वल स्थानी कायम आहे.
एचडीएफसी बॅँक (२.३१ लाख कोटी) दुसºया, तर रिलायन्स इंडस्ट्रिज (१.८९ लाख कोटी) तिस-या स्थानावर आहेत. यानंतर, या यादीत आयटीसी (१.५९ लाख कोटी) चौथ्या, मारुती सुझुकी (१.४१ लाख कोटी) ५व्या क्रमांकावर आहे. या १०० आस्थापनांनी ५ वर्षांमध्ये ३८.९ लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली असून, ती आत्तापर्यंतची सर्वाधिक आहे.
अर्थसंकल्पीय तरतुदींनी बाजाराची घसरगुंडी
गेल्या काही महिन्यांपासून अतिशय जोमात वाढणा-या शेअर बाजाराला अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पाने तडाखा दिला आणि त्यानंतर बाजाराची घसरगुंडी झालेली बघायला मिळाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 11:35 PM2018-02-04T23:35:50+5:302018-02-04T23:39:02+5:30