Join us  

विक्रीच्या दबावाने बाजारात घसरण

By admin | Published: March 27, 2017 12:36 AM

निफ्टीने गाठलेल्या उच्चांकानंतर बाजारावर विक्रीचा दबाव येण्याची असलेली अपेक्षा गतसप्ताहामध्ये प्रत्यक्षात आली.

प्रसाद गो. जोशी निफ्टीने गाठलेल्या उच्चांकानंतर बाजारावर विक्रीचा दबाव येण्याची असलेली अपेक्षा गतसप्ताहामध्ये प्रत्यक्षात आली. त्यामुळे निर्देशांकांमध्ये घट बघावयास मिळाली. सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढल्याने ही घट काही प्रमाणात कमी झाली. या वाढीमुळेच निफ्टी ९१०० अंशांची पातळी कायम राखू शकला. जगभरातील बाजारांमध्ये असलेल्या नैराश्याचा भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये गतसप्ताहामध्ये २२८ अंशांनी घट होऊन तो २९,४२१.४० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५२ अंशांनी खाली येऊन ९१०८ अंशांवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस बाजारात झालेल्या खरेदीमुळे निफ्टीला ९१०० अंशांची पातळी राखण्यात यश आले आहे. शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने सार्वकालीक उच्चांक गाठल्यानंतर बाजारावर विक्रीचा दबाव येण्याची शक्यता होती. त्यानुसार गतसप्ताहामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.सप्ताहाचे पहिले तीन दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरील शेअर बाजारांमध्ये असलेली मंदी आणि मोठ्या प्रमाणावर असलेला विक्रीचा जोर यामुळे निर्देशांक खूपच खाली आले. त्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये बाजारात खरेदीदार मोठ्या प्रमाणावर उतरले. त्यामुळे बाजार काही प्रमाणात वाढला असला तरी आधीची घट भरून न निघाल्याने बाजारात साप्ताहिक घट नोंदविली गेली.गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्था आणि संस्थात्मक गुंतवणुकदारांनी भारतीय बाजारामधून ४०८७.०१ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.बाजार खाली आल्यावर या संस्था खरेदीसाठी उतरल्याने बाजाराची घट काही प्रमाणात कमी झाली.अमेरिकेचे धोरण स्पष्ट होत नसल्याने माहिती तंत्रज्ञान आस्थापनांना त्याचा फटका बसत आहे. या आस्थापनांचे दर कमी होत असून त्यांचे बाजारमूल्यही घटले आहे.मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत आस्थापनांपैकी पहिल्या दहा क्रमांकावर असलेल्या आस्थापनांमधील चौघांच्या बाजारमूल्यात नुकत्याच संपलेल्या सप्ताहाअखेर मोठी घट झाली आहे. टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलीव्हर या चार आस्थापनांच्या बाजारमूल्यामध्ये २६ हजार ७३८ कोटी रुपयांनी घट झाली आहे. रिलायन्सवर सेबीने घातलेले निर्बंध आणि माहिती तंत्रज्ञान आस्थापनांच्या समभागांमध्ये झालेली घट याचा हा परिणाम आहे. अन्य आस्थापनांच्या बाजारमूल्यामध्ये वाढ झाली असली तरी झालेल्या घटीपेक्षा वाढ कमीच आहे.शेअर बाजारातील पहिल्या दहा आस्थापनांपैकी एचडीएफसी बॅँक, आयटीसी, ओएनजीसी,एचडीएफसी, स्टेट बॅँक आणि कोल इंडिया या सहा आस्थापनांच्या बाजारमूल्यामध्ये वाढ झाली आहे. १२हजार ३१९.९५ कोटी रुपयांनी या सहा आस्थापनांचे बाजारमूल्य वाढले आहे. टीसीएसच्या बाजारमूल्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १९७२३.४ कोटी रुपयांनी घट होऊनही पहिले स्थान मात्र कायम आहे.