Join us

फारशी उलाढाल नसल्याने बाजार जवळपास जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:52 PM

अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत जाहीर झालेला नकारात्मक अंदाज आणि परकीय वित्तसंस्थांची विक्री अशा वातावरणामध्ये भारतामधील शेअर बाजारांमध्ये फारशी उलाढाल दिसून आली नाही.

- प्रसाद गो. जोशीअमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्धाबाबत निघत नसलेला तोडगा, जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंदावलेले व्यवहार, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबत जाहीर झालेला नकारात्मक अंदाज आणि परकीय वित्तसंस्थांची विक्री अशा वातावरणामध्ये भारतामधील शेअर बाजारांमध्ये फारशी उलाढाल दिसून आली नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेली मोठी निर्गुंतवणूक हीच काय ती नवीन घटना राहिली.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ निर्देशांक खाली येऊन झाला. बाजारात फारसे व्यवहार झाले नाहीत. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांक ४०,८१६.३८ अंश ते ४०,२२१.९७ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो ४०,३५९.४१ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या तुलनेत तो अवघा २.८२ अंशांनी वाढला.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही फारसे व्यवहार झालेले दिसले नाहीत. येथील निर्देशांकामध्ये (निफ्टी) केवळ १८.९५ अंशांची वाढ होऊन तो ११,९१४.४० अंशांवर बंद झाला.क्षेत्रीय निर्देशांकापैकी मिडकॅप या निर्देशांकामध्ये सप्ताहात ३३.५२ अंशाची (०.२३ टक्के) घट होऊन १४,७३८.६७ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये ०.२१ टक्के म्हणजे २७.३८ अंशांची किरकोळ वाढ बघावयास मिळाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १३,३५३.७८ अंशांवर बंद झाला.केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर निर्गुंतवणुकीला हिरवा कंदील दाखविला असून त्यामध्ये काही नीलमणी कंपन्याही आहेत. या एका बातमी व्यतिरिक्त बाजारात सकारात्मक काही झाले नाही. परकीय वित्तसंस्थांनी सप्ताहामध्ये ४७०९.७५ कोटी रुपयांची विक्री केली, तर देशी वित्तसंस्थांनी ३३०.१ कोटी रुपयांची खरेदी केली. अमेरिका-चीन दरम्यान व्यापारयुद्धाबाबत काहीच होेत नसल्याने बाजारात चिंता आहे. दरम्यान ओसीईडी या संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ५.८ टक्कयांनी होण्याची शक्यता वर्तविली आहे. संस्थेने आपला आधीचा अंदाज यावेळी कमी केला आहे.