मुंबई : सौदी अरेबियातील तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजारातीलनिफ्टीमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्समध्ये मंगळवारी 650 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीत 150 अंकांची घट झाली आहे.
आज शेअर बाजारात सेन्सेक्स 642 अंकांची घसरण होऊन 36,481 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीत 186 अंकांची घट होऊन 10,817 अंकांवर पोहोचला. बँकिंग, वाहन उद्योग, धातू आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील शेअर्सच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली.
2.30 लाख कोटी रुपयांचे नुकसान
आज गुंतवणुकदारांना शेअर बाजारात 2.30 लाख कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, काल बीएसईवर लिस्टेड एकूण कंपन्यांचे मार्केट कॅप 1,42,08,049.05 कोटी रुपये होते. ते आज 1,39,75,844.03 कोटी रुपये झाले आहे. यावरुन 2,32,205 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाहन उद्योग आणि बँकिंगमध्ये घसरण
शेअर बाजारात वाहन उद्योग आणि बँकिंग क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसून आले. हिरो मोटो कॉर्पच्या शेअरमध्ये 6.42 टक्के, ऍक्सिस बँकेच्या शेअरमध्ये 4 टक्के तर आयसीआयसीआय, एसबीआय, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, टाटा स्टील, मारुती, एचडीएफसी आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरमध्ये 2 ते 3 टक्क्यांनी घट झाली. तसेच, टाटा स्टील, एलएंडटी, एनटीपीसी आणि वेदांता या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.