मु्ंबई : गेल्या काही दिवसांपासून दिसत असलेली तेजी शुक्रवारीही कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा एकदा मागचे उच्चांक मोडीत काढत नवे शिखर गाठले. सेन्सेक्स आजवरच्या ७१,६०५.७६ या उच्चांकावर पोहोचला होता, तर निफ्टीनेही २१,४९२.३० अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. बाजारातील तेजीमुळे तीन दिवसांत गुंतवणूकदार तब्बल चार लाख कोटींचा फायदा झाला आहे.
सेन्सेक्स ९६९ अंकांच्या वृद्धीनंतर ७१,४८३ अंकांवर बंद झाला. निफ्टीही २७३ अंकांच्या वाढीनंतर २१,४५६ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी २२ मध्ये वाढ दिसून आली, तर ८ शेअर्समध्ये घट झाली.
इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्री या कंपन्यांच्या शेअरमध्ये शुक्रवारी वाढ झाली, तर पॉवर ग्रीड, एचडीएफसी लाइफ आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये घट झाली.
गुरुवारी बाजारात तेजी दिसून आली होती. गुरुवारी सेन्सेक्सने ७०,६०२.८९ चा उच्चांक गाठला होता, तर निफ्टीने आजवरचा २१,२१०.९० चा उच्चांक गाठला होता. गुरुवारी सेन्सेक्स ७०,५१४ वर, तर निफ्टी २१,१८२ अंकांवर बंद झाला.
तेजीची प्रमुख कारणे
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घट
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून वाढलेली गुंतवणूक
देशाच्या परकीय चलनात वाढ झाल्याने बाजाराला मजबुती
अमेरिकन फेडरल बँकेने सलग तिसऱ्यांदा व्याजदरातन केलेली वाढ.
या वर्षात १७% वाढ
वर्षाच्या सुरुवातीलाच २ जानेवारी रोजी सेन्सेक्स ६१,१६७ अंकांवर होता. १५ डिसेंबर रोजी सेन्सेक्सने ७१,६९५ अंकांची उंची गाठली.
या काळात सेन्सेक्समध्ये १०,४३८ अंकांची म्हणजेच १७ टक्के वाढ झाली. आगामी काळात तेजी कायम राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे.