मुंबई : लोकसभा निवडणुकासाठी काल सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सेन्सेक्स 802 अंकांनी वाढला असून निफ्टीतही 229 अंकांची वाढ झाली आहे. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली. शेअर बाजारात 802 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 38,819.68 अंकांवर उघडला. तर निफ्टीतही 229 अंकांची वाढ होऊन 11,691.30 अंकांवर उघडला.
रिटेल रिसर्टचे प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले की, ' लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलने जास्तकरुन भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातही असा अंदाज दिसत होता. जर भाजपाने स्वबळावर बहुमत मिळविले, तर शेअर बाजारात आणखी उसळी येईल.' दरम्यान, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना माहीत आहे की, बऱ्याचदा एक्झिट पोल चुकीचे ठरु शकतात. त्यामुळे शेअर बाजार एक मजबूत सरकार पाहते. मात्र, निकाल लागेपर्यंत म्हणजेच 23 मेपर्यंत लोकांनी वाट पाहिली पाहिजे, असेही दीपक जसानी म्हणाले.