भारतात लग्नाला पवित्र बंधन मानलं जातं. लग्न ७ जन्माचं नातं असतं, दोन जीवांचं मनोमिलन होतं असं खूप काही लग्नाबद्दल सांगितलं जातं. परंतु तुम्हाला माहित्येय, लग्न हे तुमच्यासाठी आर्थिक फायदेशीर ठरतं. त्याचे अनेक फायदे जे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या फायद्यापासून वेगळे आहेत. भारतात लग्नाला कायदेशीर मान्यता असते. त्यामुळे मिळणाऱ्या फायद्यात आर्थिक बाबींचाही समावेश असतो. ज्यात तुम्हाला आयकरातून सूट त्यासोबतच गुंतवणुकीचेही पर्याय उपलब्ध असतात. चला जाणून घेऊ नक्की काय होतात फायदे?
लग्नामुळे वाचवा इन्कम टॅक्स
जर तुमचे लग्न झाले असेल तर इन्कम टॅक्समध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्यामुळे तुम्हाला करात सवलत मिळते आणि तुमची बचत वाढते.
होम लोन - इन्कम टॅक्स कायद्यानुसार, जर होम लोनच्या मुद्दल आणि व्याजाच्या रक्कमेवरही करात सूट मिळते. त्यात विवाहित लोकांना मोठा फायदा मिळतो. जर तुमचं संयुक्त गृह कर्ज असेल त्यात ५०-५० टक्के भागीदारी असेल तेव्हा ८० सी मधून तुम्हाला होम लोनच्या प्रिसिंपल अमाऊंट पेमेंटवर मिळणारी दीड लाखाची सूट हे वाढून ३ लाखापर्यंत मिळते. जर तुम्ही लग्नानंतर होम लोन घेतलं असेल तर २४ बी नुसार होम लोनच्या २ लाखापर्यंतच्या व्याज भरपाईवर कर सूट दुप्पट होते. लग्नामुळे तुम्ही दरवर्षी ४ लाखांपर्यंत व्याजदरावरील इन्कम टॅक्समध्ये सवलतीचा फायदा घेऊ शकता.
मेडिकल अथवा आरोग्य विमा - इन्कम टॅक्समध्ये आरोग्य विमा घेतला असेल तर त्यावरही करात सूट मिळते. ८० डी अंतर्गत जर पती-पत्नीपैकी कुणीही एक कामावर असेल तर तुम्हाला कमाल २५ हजारापर्यंत प्रिमियम पेमेंटवर सूट मिळते. जर दोघेही कामावर असतील ही मर्यादा ५० हजारांवर पोहचते.
मुलांचं शिक्षण - या कर सवलतीचा फायदा विवाहित लोकांनाच मिळतो. ८० सी अंतर्गत पती-पत्नी दोघेही करदाते असतील तर मुलांच्या शिक्षणासाठी कराच्या सवलतीची मर्यादा ३ लाखांपर्यंत मिळते.
लिव ट्रॅव्हल अलाऊंस - जर पती पत्नी दोघेही करदाते आणि नोकरीवर असतील तर तुम्ही ४ वर्षाच्या काळात एलटीएचा फायदा घेत एकूण ८ टूर एन्जॉय करू शकता. एलटीएच्या पैशावर तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता. यात कुठलीही फिक्स मर्यादा नाही परंतु ते तुमच्या सॅलरी पॅकेजवर डिपेंड आहे.