Join us

शेअर मार्केटमध्ये "मंगल", निफ्टीने पार केला 10 हजाराचा विक्रमी आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 10:36 AM

शेअर मार्केट सुरु होताच निफ्टी 44.15 अंकांनी वाढून 10,010.55 वर पोहोचला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - शेअर मार्केटसाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. निफ्टीने पहिल्यांदाच 10 हजाराचा विक्रमी आकडा पार केला आहे. शेअर मार्केट सुरु होताच निफ्टी 44.15 अंकांनी वाढून 10,010.55 वर पोहोचला. या आठवड्यात निफ्टी 10 हजाराचा आकडा पार करेल अशी शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती, मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच हा विक्रम होईल याची अपेक्षा नव्हती. दुसरीकडे सेन्सेक्सही रेकॉर्ड लेव्हलवर ट्रेंड करत आहे. 106 अंकांनी वाढून सेन्सेक्स 32,352 वर सुरु झाला. 
 
निफ्टीने विक्रमी आकडा पार करण्यामागे रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, अदानी पोर्ट्स, इंडियाबुल मार्केट, एचडीएफसी बँकांसारख्या कंपन्यांची मुख्य भूमिका आहे. या कंपन्यांचे शेअर्स चांगल्या अंकांसोबत ट्रेंड करत होते. निफ्टी या आठवड्यातच 10 हजाराचा ऐतिहासिक आकडा पार करेल याची शक्यता सोमवारी मार्केटकडे पाहूनच अनेकांनी व्यक्त केली होती. आठवड्याचा पहिला दिवस सोमवार शेअर बाजारसाठी रेकॉर्ड करणारा ठरला. सेन्सेक्स 0.7 तर निफ्टी 0.5 टक्के वाढून रेकॉर्ड लेव्हलवर बंद झाला होता.