नवी दिल्ली: देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र संकटात सापडलं आहे. सर्वच प्रकारच्या वाहनांना फारशी मागणी नसल्यानं कंपन्या अडचणीत आल्या आहेत. याबद्दल भाष्य करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रवासी वाहतूक क्षेत्रातील मंदीसाठी ओला, उबरसारख्या कंपन्या जबाबदार असल्याचं म्हटलं. यावर मारुती सुझुकीनं प्रतिक्रिया दिली आहे. मंदीच्या कारणांचा अभ्यास करायला हवा, असं कंपनीच्या विपणन आणि विक्री विभागाचे संचालक शशांक श्रीवास्तव यांनी म्हटलं. ओला, उबरमुळे लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. ओला, उबरची सेवा उपलब्ध असल्यानं अनेकजण कार विकत घेत नाहीत, असं निर्मला सीतारमण यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटलं. मात्र कार खरेदीबद्दल लोकांची मानसिकता बदलली नसल्याचं शशांक श्रीवास्तव म्हणाले. 'लोक गरज म्हणून, चैन म्हणून कार खरेदी करतात. अद्यापही लोकांच्या मानसिकतेत बदल झालेली नाही. सध्या बाजारात असलेल्या मंदीमागील कारणांचा अभ्यास करायला हवा. मात्र या मंदीमागे ओला, उबर हे मोठं कारण असल्याचं मला वाटत नाही,' असं त्यांनी पुढे सांगितलं. ओला, उबर असूनही गेल्या 6 वर्षांमध्ये ऑटोमोबाईलची स्थिती चांगली होती, याकडे श्रीवास्तव यांनी लक्ष वेधलं. 'ओला, उबर गेल्या 6-7 वर्षांपासून सेवा देत आहेत. मात्र या काळात अनेकदा कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मंदीचा सामना करावा लागत आहे. मात्र ओला, उबरमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं मला वाटत नाही,' असं श्रीवास्तव यांनी सांगितलं. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. उबर अमेरिकेतील अॅप बेस्ड सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र तरीही गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत कारची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मारुती सुझुकी म्हणते, ओला, उबर नव्हे, मंदीचं कारण 'वेगळंच'!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:28 PM