Join us

मंदीचा फटका?; मारुती सुझुकीवर 'अशी' वेळ गेल्या सात वर्षांत आली नव्हती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 4:47 PM

गेल्या सात महिन्यांपासून मारुती सुझुकी सातत्यानं उत्पादन कमी-कमी करतेय.

ठळक मुद्देदेश मंदीचे चटके सोसत असताना ऑटो क्षेत्राला अगदीच 'बुरे दिन' आलेत.२०१२ नंतर गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच 'मारुती'ला आपल्या गाड्यांचं उत्पादन बंद ठेवावं लागतंय. गुरुग्राम आणि मानेसार या दोन ठिकाणी मारुती सुझुकीची प्रॉडक्शन प्लांट आहेत.

संपूर्ण जगच आर्थिक मंदीचे चटके सहन करत असताना, भारतालाही त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अनेक क्षेत्रांना मंदीचा फटका बसतोय, नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडतेय. परंतु, ऑटो क्षेत्राला अगदीच 'बुरे दिन' आलेत. अशातच, देशातील मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीनं मोठी घोषणा केली आहे. हरियाणातील दोन्ही प्लांटमध्ये त्यांनी दोन दिवसांचा 'नो प्रॉडक्शन डे' घोषित केला आहे. हे पाऊल कर्मचाऱ्यांची चिंता वाढवणारंच आहे. २०१२ नंतर गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच 'मारुती'ला आपल्या गाड्यांचं उत्पादन बंद ठेवावं लागतंय. 

गुरुग्राम आणि मानेसार या दोन ठिकाणी मारुती सुझुकीची प्रॉडक्शन प्लांट आहेत. शनिवारी ७ सप्टेंबर आणि सोमवारी ९ सप्टेंबर या दोन दिवशी तिथलं काम पूर्णपणे बंद राहणार आहे. तसं पत्रकच कंपनीनं प्रसिद्ध केलं आहे. मधला रविवार धरल्यास सलग तीन दिवस कारचं उत्पादन बंद असेल. या 'नो प्रॉडक्शन डे' मागचं कारण कंपनीनं सांगितलं नसलं, तरी हा मंदीचाच फटका असल्याचं बोललं जातंय. 

गेल्या सात महिन्यांपासून मारुती सुझुकी सातत्यानं उत्पादन कमी-कमी करतेय. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या निर्मितीत ३३.९९ टक्क्यांनी कपात केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १ लाख ६८ हजार ७२५ गाड्यांची निर्मिती करणाऱ्या मारुतीनं यावेळी १ लाख ११ हजार ३७० कार तयार केल्या. विक्रीमध्येही गेल्या ऑगस्टच्या तुलनेत ३२.७ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये मारुतीनं १,०६,४१३ कार विकल्या. गेल्या वर्षी कारविक्रीचा आकडा १,५८,१८९ इतका होता. 

ऑल्टो, वॅगन आर या मिनी कारची विक्री ७१ टक्क्यांनी घटली. कॉम्पॅक्ट कार या वर्गात मोडणाऱ्या स्विफ्ट, इग्निस, बलेनो आणि डिझायर यांच्या विक्रीतही २३ टक्क्यांची घट झाली. मारुती सुझुकी सियाजची फक्त १५९६ युनिट्स विकली गेली. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ही संख्या ७ हजार इतकी होती.  या पार्श्वभूमीवरच, कंपनीनं 'नो प्रॉडक्शन डे'ची घोषणा केली असावी, असा अंदाज आहे. 

अर्थव्यस्थेस चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण रेटणे आवश्यक

शेअर बाजाराचा ७७०चा शॉक; गुंतवणूकदारांवर मंदीचे विघ्न!

मोदी सरकारच्या सर्वव्यापी गोंधळामुळे देश मंदीच्या गर्तेत 

टॅग्स :मारुती सुझुकीवाहनवाहन उद्योग