Join us

किमती घटवण्याचा मारुती सुझुकीचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 3:07 AM

टोयोटा, होंडा, ह्युंदाई यांचा मात्र नकार; आणखी घटविणे अशक्य

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केल्यानंतर मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती कमी करण्याच्या मुद्द्य़ावर विचार चालवला आहे. ह्युंदाई, टोयोटा आणि होंडा यांनी मात्र किमती कमी करण्यास नकार दिला आहे. सध्या ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सवलती पुरेशा असून, किमती आणखी कमी करण्यास वाव नाही, असे या कंपन्यांनी म्हटले आहे.कॉर्पोरेट करात कपात झाल्यामुळे कारच्या किमती कमी करणार का, या प्रश्नावर मारुती सुझुकीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, किमती कमी करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. येत्या एक-दोन दिवसांत काही तरी घोषणा होऊ शकते. जो काय निर्णय घ्यायचा तो लवकर घेतला जाईल. आम्ही महिनाभर वाट पाहत थांबणार नाही. या आधी भार्गव यांनी म्हटले होते की, वाहनांचा किफायतशीरपणा कमी झाला आहे. वाहनांच्या विक्रीत घट होण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.टोयोटा, किर्लोस्करचे उप-चेअरमन शेखर विश्वनाथन यांनी सांगितले की, कॉर्पोरेट करात कपात झाल्यामुळे कारच्या किमती लगेच कमी होण्याची शक्यता नाही. कमी करामुळे आमच्या रोखीच्या समस्येत सुधारणा होईल. तथापि, उत्पादन खर्च कमी झालेला आहे का? त्याचे उत्तर आहे, नाही. त्यामुळे किमती कमी करण्यास फारसा वावच नाही.सध्याच्या सवलती पुरेशाह्युंदाईचे विक्री विभागप्रमुख विकास जैन म्हणाले की, किमती कमी करण्याचा विषय सध्या आमच्यापुढे आहे. किमतीत कपात करताना नफा क्षमतेबरोबरच अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. होंडा कार्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश गोयल म्हणाले की, कारच्या किमती कमी करण्याचा आमचा सध्या तरी कोणताही विचार नाही. आम्ही विविध मॉडेल्सवर सध्या विविध सवलती देत आहोत आणि त्या सवलती पुरेशा आहेत.

टॅग्स :मारुती सुझुकीटाटाह्युंदाईहोंडा