Join us

मारुतीच्या नफ्याला आंदोलनामुळे झळ

By admin | Published: April 27, 2016 5:07 AM

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचा ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ११.७ टक्क्यांनी घटून ११३३.६ कोटी रुपये झाला.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचा ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ११.७ टक्क्यांनी घटून ११३३.६ कोटी रुपये झाला. हरियाणातील जाट आंदोलन, महागड्या जाहिरातींमुळे कंपनीच्या नफ्यात घट झाली.गेल्या वित्तीय वर्षात याच तिमाहीत कंपनीला १२८४.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने म्हटले आहे की, जाट आंदोलनामुळे कंपनीचे १० हजार मोटारींचे उत्पादन कमी झाले. त्यातच महागड्या जाहिराती आणि अन्य काही कारणांमुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला.मात्र या तिमाहीत कंपनीची विक्री १२.५ टक्क्यांनी वाढली. या काळात १४९२९.५ कोटी रुपयांच्या वाहनांची विक्री झाली. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत १३,२७२.५ कोटी रुपयांच्या वाहनांची विक्री झाली होती. या तिमाहीत कारची विक्री ३.९ टक्क्यांनी वाढून ३,६०,४०२ वाहने झाली. या काळात कंपनीच्या २७,००९ कारची निर्यात झाली. ३१ मार्च रोजी संपलेल्या पूर्ण वित्तीय वर्षात कंपनीचा निव्वळ नफा २३.२ टक्क्यांनी वाढून ४,५७१.४ कोटी रुपये झाला. यापूर्वीच्या वित्तीय वर्षात तो ३७११.२ कोटी रुपये होता. या वित्तीय वर्षात कंपनीच्या वाहनांची विक्री १५.९ टक्क्यांनी वाढून ५६,३५०.४ कोटी रुपयांच्या वाहनांची विक्री झाली. गेल्या वित्तीय वर्षात ४८,६०५.५ कोटी रुपयांच्या वाहनांची विक्री झाली होती.